मुंबई : राज्यसभेने आम्हाला खूप काही शिकवले आहे. विरोधी पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेत केलेल्या चुका यावेळी आम्ही करणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे. विधान परिषदेच्या मतदानासाठी आले असता ते बोलत होते. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. यावेळी रोहित पवारदेखील आले होते. त्यांनी विरोधकांवर टीका केली. आम्ही सर्व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आमदार एक आहोत. मागील वेळी एका मतामुळे सर्व समीकरण बदलले. त्यामुळे एक एक मताची काळजी आम्ही घेतली आहे. आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. विरोधकांमध्ये मात्र अतिआत्मविश्वास असल्याचा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विरोधकांना लगावला. त्यामुळे सहाही उमेदवार निवडून येतील, असे ते म्हणाले.
2019चा देवेंद्र फडणवीसांचा कॉन्फिडन्स आठवा. निवडणुकीपूर्वीचे त्यांचे एक भाषण खूप प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे आत्ता ते जे काही बोलत आहेत, तो अतिआत्मविश्वास आहे. त्यांचा पाचवा उमेदवार जो आहे, त्याची वेगळी समीकरणे बसवण्यासाठी असेल. त्यांनी कितीही आत्मविश्वास दाखवला तरी त्यांना वीस मते आवश्यक आहेत. तर काँग्रेससह आम्हाला आठ ते नऊ मते हवी आहेत, असे ते म्हणाले.
संख्याबळ नसले तरी वातावरण तयार करण्याची भाजपाची रणनीती आहे. राज्यसभेलादेखील वातावरण तयार केले. त्यावेळी आमचे हक्काचे मत वेगळ्या पद्धतीने का होईना बाद झाले. त्यामुळे सगळी समीकरणे बदलली. मात्र यावेळी काळजी घेत आहोत. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्ड नाहीत. होणारच, असे आम्ही म्हणत नाहीत. मात्र विजय होईल, असा आत्मविश्वास वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले. भाजपाकडे अर्थकारणाची ताकद जास्त आहे आणि माध्यमांनीही ही बाब स्वीकारली, हे चांगले असल्याचेही ते म्हणाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा विजयी होईल, असा दावा केला होता. राज्यसभेत ज्याप्रमाणे उमेदवार विजयी झाला, तसाच आताही होईल, असे ते म्हणाले होते.