Ramdas Athawale : राज्य सरकारमध्ये रिपाइंच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद मिळवून देणार, पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आठवलेंना विश्वास
एका कार्यकर्त्याला राज्यात मला निश्चित मंत्रिपद मिळवून द्यावे लागेल. एका कार्यकर्त्याची त्यासाठी मला निवड करावी लागेल. त्याबाबत लवकर निर्णय घेईन, असे रामदास आठवले म्हणाले.
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India A) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात देशभरातून रिपब्लिकन पक्षाचे 600 प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य सरकारच्या विविध निर्णयांना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
नव्या सरकारला पाठिंबा
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 26 लोकांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर आठवले यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारविषयी आपले मत व्यक्त केले. रिपाइंला मंत्रीपदाची मागणीदेखील करण्यात आली.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांची मागणी
ते म्हणाले, की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मला रिपब्लिकन कार्यकर्ते मंत्रीपदी निवड करण्याची मागणी करीत आहेत. अनेकांनी इच्छा व्यक्त करत निवेदन दिले आहे. त्यांच्यापैकी एका कार्यकर्त्याला राज्यात मला निश्चित मंत्रिपद मिळवून द्यावे लागेल. एका कार्यकर्त्याची त्यासाठी मला निवड करावी लागेल. त्याबाबत लवकर निर्णय घेईन, असे रामदास आठवले म्हणाले.
‘मुंबईच्या विकासासाठी मेट्रोसुद्धा आवश्यक’
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात काही प्रमाणात कपात केली आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मेट्रो कारशेड हे आरे येथे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आमचा पाठिंबा आहे. पर्यावरण आणि वनीकरणाला आमचा पाठिंबा आहे. जंगल वाढविता येईल. मात्र मुंबईच्या विकासासाठी मेट्रोसुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आरेमध्ये नियोजित मेट्रो कारशेडला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, असे आठवले यांनी जाहीर केले.