Milk rate : ‘महानंद’कडून दुधाच्या खरेदी भावात दोन रुपयांची कपात; पुरवठा वाढल्याने निर्णय, शेतकऱ्यांना आर्थिक फटका
महानंद डेअरीने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात दोन रुपयांची कपात केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या दर कपातीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
मुंबई : महानंद डेअरीने (Mahananda Dairy) शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात (Milk rate) दोन रुपयांची कपात केली आहे. पुर्वी शेतकऱ्यांना लिटरमागे 35 रुपयांचा भाव दिला जात होता. मात्र आता दरात दोन रुपयांची कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना (Farmers) प्रति लिटर 33 रुपयांचाच भाव मिळणार आहे. चार महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठ्यात पुरेशा प्रमाणात वाढ झाल्याने महानंदच्या वतीने शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानंद डेअरीकडून दररोज दीड लाख लिटर पिशवीबंद दुधाचे वितरण केले जाते. पिशवीबंद दुधाचा ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी महानंदकडून तालुका आणि जिल्हा स्तरावरील सहकारी दूध संघांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दूध खरेदी केले जाते. पूर्वी या दुधाला प्रति लिटरमागे 35 रुपये एवढा भाव दिला जात होता. मात्र आता दुधाची आवक वाढल्याने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यातही दुधाला 35 रुपये एवढाच भाव मिळत होता. मात्र आता त्यातही दोन रुपयांची कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
दूध पावडरची मागणी घटल्याचा परिणाम
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरच्या मागणीत घट झाली आहे. दूध पावडरची मागणी कमी झाल्याने खासगी दूध महासंघांकडून दुधाची खरेदी कमी करण्यात आली आहे. खासगी दूध महासंघांकडून आता पूर्वी इतके शेतकऱ्यांचे दूध खरेदी होत नसल्याने, महानंदला होणाऱ्या दुधाचा पुरवठा वाढला आहे. दुधाचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने महानंदकडून शेतकऱ्यांच्या दूध दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधापासून तयार करण्यात आलेल्या पावडरला मोठी मागणी होती. त्यामुळे खासगी दूधसंघ देखील शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात दुधाची खरेदी करत होते. या स्पर्धेमध्ये दुधाला चांगला भाव मिळत होता. मात्र आता दूध पावडरची मागणी कमी झाल्याने खासगी महासंघाकडून दूध खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे महानंदकडे होणारा दुधाचा पुरवठा वाढला आहे.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालनासाठी मोठाप्रमाणात खर्च येतो. महागाई वाढली आहे. महागाईबरोबरच पशूखाद्याचे दर देखील वाढले आहेत. सोबतच मजुरीत देखील अव्वाच्यासव्वा वाढ झाली आहे. त्यामुळे दुधातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मार्जीनमध्ये मोठी घट झाली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे महानंद डेरीकडून आहे त्या भावात दोन रुपयांची कपात करण्यात आल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.