Chandrayaan 3 Successful : अभिनंदन इस्रो!; चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर सामनातून भरभरून कौतुक
Saamana Editorial on Chandrayaan 3 Landed on Moon : इस्रोचं चांद्रयान 3 चंद्रावर लँड; अभिनंदन करताना सामनातून मुंबई-गोवा महामार्गाची आठवण, पाहा काय म्हणाले...
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : भारतासह अवघ्या जगाचं लक्ष असलेल्या चांद्रयान मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आपण गाठला आहे. चांद्रयान 3 चं लँडर काल संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी लँड झालं. हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आणि जगासाठी नवी आशा दाखवणारा क्षण होता. त्यामुळे इस्रो आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. आजच्या सामना अग्रलेखातूनही इस्रोचं अभिनंदन करण्यात आलं आहे. भारतच नव्हे तर जगासाठीच हा क्षण अभिमानाचा आहे. त्यासाठी समस्त ‘इस्रो’ परिवाराचे आम्ही खास अभिनंदन करीत आहोत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली असून 140 कोटी भारतीयांच्या दृष्टीने हा गौरवाचा क्षण आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’च्या सर्व शास्त्रज्ञांचे यासाठी अभिनंदन करावे तेवढे थोडेच. चांद्रयान सुखरूप चंद्रावर उतरले ते फक्त पंतप्रधान मोदींमुळेच असे त्यांचे भक्त सांगत सुटले आहेत. ‘चांद्रयान’ चंद्रावर नेण्यासाठी परिश्रम करणाऱया शास्त्रज्ञांचा हा अपमान आहे. भारताच्या आधी रशियाने चांद्रमोहीम आखली, पण त्यांचे यान ‘ल्युना’ चंद्रावर उतरण्याआधीच उद्ध्वस्त झाले.
अवकाशयानाचा थ्रस्टर नियोजित 84 सेकंदांऐवजी 127 सेकंदांसाठी उडाला व त्यामुळे रशियाचे चांद्रयान क्रॅश झाले. रशियाच्या चांद्रमोहिमेच्या अपयशामुळे अवकाशातील एकंदर परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पण भारतीय शास्त्रज्ञांनी त्या परिस्थितीवर मात करून आपले चांद्रयान चंद्रावर उतरवले. चंद्राच्या दक्षिण धुवावर अंतराळयान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. देशाच्या वैज्ञानिक कार्यक्रमातील हा सर्वोच्च क्षण आहे. पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी 3 लाख 84 हजार किमी अंतरावर आहे.
आपण पृथ्वीवरून चंद्राचे जे गोंडस व शीतल रूप पाहतो ते वेगळे व प्रत्यक्षात चंद्राचे स्वरूप वेगळे आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडस्केप खडबडीत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांची आठवण करून देतील असे चंद्रावर आहेत. त्यामुळे चांद्रयान उतरताना आव्हान होते. प्रगत सेन्सर्सचा वापर करून तेथील प्रकाश योजनेत बदल करावा लागला. सर्व अवघड परिस्थितीशी सामना करून पृथ्वीवरील आपल्या शास्त्र्ज्ञांनी चांद्रयान चंद्रावर उतरवले. चांद्रयान मानवरहित आहे, पण माणसाचे त्यावर नियंत्रण आहे.
राकेश शर्मा ही पहिली भारतीय व्यक्ती अंतराळात गेली होती. भारतीय वंशाच्या अमेरिकन सुनीता विल्यम अंतराळात सर्वाधिक काळ राहिल्या. कल्पना चावला या प्रथम अमेरिकन वंशाच्या भारतीय महिला अंतराळवीर होत्या. आता भारताचे यान चंद्रावर उतरले. चंद्रावर हवा, पाणी, खनिज वगैरे संपत्तीचा शोध घेणारे संशोधन हे ‘चांद्रयान-3’ करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरले व ते त्यास ठरवून दिलेल्या कामास लागले.