एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊतांचा सरकारवर घणाघात
Saamana Editorial on Akshay Shinde Encounter : आजच्या सामनाच्या अग्रलेखआतून अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर भाष्य करण्यात आलं आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. एका शिंद्याचे एन्काऊंटर!, असं आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...
बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा परवा दिवशी एन्काऊंटर करण्यात आला. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. ‘एका शिंद्याचे एन्काऊंटर!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून शिंदे सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बदलापुरातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्या, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसंच अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची चौकशी करावी, असंही सामनाचा अग्रलेखात म्हणण्यात आलं.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
महाराष्ट्राच्या बाबतीत सध्या जे घडवले जात आहे ते भयंकर आहे. राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाटही आहेत. लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट खोक्यांवर उभे राहून सरन्यायाधीशांशी हास्यविनोद करतात. कायद्याची भीती राहिलेली नाही व न्यायदेवता खोकेबाजांची बटीक बनली आहे. महाराष्ट्रातील एकूणच माहोल विद्यमान सत्ताकाळात बिघडला आहे. जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीसांच्या खुर्चीखाली वात पेटवली आहे. जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित करण्यासाठी बदलापूरच्या आरोपीस गोळ्या घातल्या, पण गृहमंत्र्यांचे संरक्षण असलेले सूत्रधार आपटे, कोतवाल, आठवले मात्र मोकळेच राहिले!
सरन्यायाधीश चंद्रचूड हे मुंबईत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत असतानाच बदलापूर बलात्कार कांडातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आले. त्याआधी या शिंदेने पोलिसांच्या हातातले शस्त्र हिसकावून आत्महत्या केली असे सांगण्यात आले, पण लगेच पटकथेत बदल केला व शिंदेला पोलिसांनी मारले. त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी शिंदेला मारले, असा रहस्यमय सिनेमा पडद्यावर आला. बलात्कार कांडातील आरोपींना अशाच प्रकारची कठोर शिक्षा व्हायला हवी. खटलेबाजी, तारखांवर तारखा, फास्ट ट्रकची नाटके या घोळात न अडकता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा झटपट न्याय व्हायलाच हवा.
बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींच्या बाबतीत जे घडले, त्यामुळे देश हादरला. पीडित मुलींच्या आईंची तक्रार घ्यायला बदलापूरचे पोलीस तयार नव्हते. जनता रस्त्यावर उतरली, रेल्वे बंद केली, मंत्र्यांना अडवले तेव्हा कोठे ‘वर्षा’वरील शिंद्यांनी बलात्कारी शिंदेवर कारवाई केली. आरोपीला आमच्या हातात द्या, आम्हीच त्याला फासावर लटकवतो, अशी मागणी आंदोलकांची होती. मिंधे सरकारने अशा शेकडो आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करून त्यांची धिंड काढली. आंदोलकांच्या घरात पोलीस घुसवले. आता पोलिसांनी अक्षय शिंदेला न्यायालयीन कोठडीतून बाहेर काढून चकमकीत उडवले आहे.
जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असे शिंदे-फडणवीस तेव्हा का बोंबलत होते? त्यामुळे बदलापुरातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यायला हवेत.