महामहोपाध्याय फडणवीसकृत इतिहास बदलायला निघालेत, पण; संजय राऊतांचा हल्लाबोल
Saamana Editorial on Devendra Fadnavis : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'महामहोपाध्याय फडणवीसकृत' असा देवेंद्र फडणवील यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सामना अग्रलेखात नेमकं काय? वाचा सविस्तर बातमी...
राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ आठच महिन्यात कोसळला. त्यावरून वातावरण ढवळून निघालेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानाने राजकारण तापलं आहे. शिवरायांनी सुरत लूट केलीच नसल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘शिवरायांचा नवा अपमान, महामहोपाध्याय फडणवीसकृत’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर सामनातून टीका करण्यात आली आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? म.म. फडणवीस यांना शिवरायांचे शौर्य मान्य नसावे, हे पहिले किंवा सुरत महाराष्ट्राच्या राजाने लुटली ही जखम सध्याच्या गुजराती व्यापार मंडळास अस्वस्थ करीत असेल. त्यामुळे सुरत लुटीशी शिवरायांचा संबंध नसल्याची बतावणी म.म. देवेंद्र फडणवीस यांनी केली असावी, हे दुसरे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व महाराष्ट्राच्या निर्मितीत शून्य योगदान असलेल्यांची ही पिलावळ आहे. यांनी देश लुटला ते चालते, पण महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी सुरत लुटली हा इतिहास ते बदलायला निघाले आहेत.
छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही असा जावईशोध देवेंद्र फडणवीस यांनी लावला. शिवरायांचा मर्दानी इतिहास संपविण्यासाठी फडणवीस यांनी सुरू केलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. शिवराय व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा आणखी एक अपमान करण्याचा प्रमाद देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. छत्रपतींचा रोज एक अपमान करावा असे धोरण फडणवीस व त्यांच्या भाजपने स्वीकारले आहे काय?
शिवरायांच्या लढ्यात आग्य्राहून सुटका व सुरतेची लूट हे दोन रोमांचकारी प्रसंग आहेत. त्याशिवाय इतिहास पुढे सरपू शकत नाही. आता महामहोपाध्याय फडणवीस म्हणतात, ”सुरतेवर महाराजांची स्वारी झालीच नव्हती. काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला.” महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्यासाठी व त्या वेळी काँग्रेसचा जन्म झाला नव्हता. इंग्रज, पोर्तुगीज इतिहासकारांनी महाराजांनी केलेल्या सुरतेवरील स्वारीची पक्की नोंद घेतली आहे, पण म.मो.पाध्याय फडणवीसांना ते मान्य नाही.