मुंबई : सत्ता प्राप्त करण्यासाठी गुजरातमधील नेत्यांचे मंडलिक बनू नका, अशी जळजळीत टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये मागील काही काळापासून दुरावा निर्माण झाला आहे. यात आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येत आहे. आता भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सतत आपली भूमिका बदलणारे राज ठाकरे अशी आधीपासूनच टीका होत असताना भाजपासोबतच्या युतीच्या चर्चेने पुन्हा एकदा टीकेची झोड त्यांच्यावर उठली आहे. शिवसेनेने (Shivsena) तर राज ठाकरेंवर सडकून टीका केलीच आहे. काल रिपाइंचे (आठवले गट) रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंची भाजपाला गरज नसून त्यांच्यामुळे नुकसानच होणार असल्याचे म्हटले होते. तर आज रिपाइंच्या खरात गटाचे सचिन खरात यांनीही राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
सचिन खरात राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, की राज ठाकरेजी तुम्ही पक्ष काढून 17 वर्ष झाली. मात्र असे असूनसुद्धा तुम्हाला राज्यातील जनतेने सत्ता दिली नाही. आता ऐनकेन प्रकारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, हे राज्याला दिसत आहे. तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवला.
ज्यावेळेस राज्यात भाजपा सरकार होते, त्यावेळी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाली. त्यावेळी तुम्ही म्हणालात, की एकही वीट रचू दिली जाणार नाही. परंतु आता राज्यात तुम्ही धर्मवादी आणि जातीयवादी राजकारण करताना दिसत आहात, असा घणाघात खरात यांनी राज ठाकरेंवर केला.
ते पुढे म्हणाले, की तुम्ही ध्यानात ठेवा, मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी 107 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे महाराष्ट्र कधीही कोणासमोर झुकला नाही. आता भाजपा नेते अमित शाह मुंबईमध्ये येण्याने हुरळून जाऊ नका आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी गुजरातमधील नेत्यांचे मंडलिक बनू नका, अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (खरात गट) सचिन खरात यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.