स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद
सुरुवातीला सचिन वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलायला तयार नव्हते. मात्र, NIA च्या अधिकाऱ्यांनी एक-एक करुन पुरावे दाखवल्यानंतर सचिन वाझे यांना कोणताही पर्याय उरला नाही. | Sachin Vaze NIA
मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या तपासप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती मोठे पुरावे लागले आहेत. त्यामुळे याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांची बोलती बंद झाली आहे. (CCTV footage fingerprints NIA technical evidence against Sachin Vaze in Ambani threat case)
एका इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, NIA ने अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत मोठी भर पडल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीला सचिन वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलायला तयार नव्हते. मात्र, NIA च्या अधिकाऱ्यांनी एक-एक करुन पुरावे दाखवल्यानंतर सचिन वाझे यांना कोणताही पर्याय उरला नाही. त्यानंतर सचिन वाझे यांनी NIA च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. मात्र, सचिन वाझे यांनी अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही. एनआयएच्या विशेष न्यायालयात सचिन वाझे यांच्या वकिलांनी ही माहिती दिली.
‘सचिन वाझे आणि मनसुख हिरेन 25 फेब्रुवारीला भेटले होते’
ज्या रात्री मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली त्याचदिवशी सकाळी सचिन वाझे हे मुंबईत मनसुख हिरेनला भेटले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. हा सचिन वाझे यांच्याविरोधातील सर्वात मोठा पुरावा असल्याचे मानले जात आहे.
NIA ने सीसीटीव्ही फुटेजने काढला वाझेंचा माग
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपास हाती घेतल्यापासून तांत्रिक पुरावे शोधण्यावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी एनआयएने सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता विभागाचे (CIU) कार्यालय असलेल्या पोलीस मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतची सीसीटीव्ही फुटेज मागवली होती. यामध्ये 25 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंतची सर्व फुटेज तपासण्यात आली. यामध्ये सचिन वाझे कुठे गेले, कोणाला भेटले, याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी एका फुटेजमध्ये सचिन वाझे 25 फेब्रुवारीलाच मनसुख हिरेनला भेटल्याचे दिसून आले. याशिवाय, पोलिसांनी सचिन वाझे यांच्या मोबाईल फोनचाही फॉरेन्सिक तपास केला आहे. त्यांचे जीपीएस लोकेशनही तपासण्यात आल्याचे समजते. सचिन वाझे यांच्याविरोधातील हे पुरावे अत्यंत भक्कम असल्याचे सांगितले जात आहे.
स्कॉर्पिओ गाडी वापरलीच नाही, सचिन वाझेंच्या दाव्यातील खोटेपण उघड
मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आरोप व्हायला लागल्यापासून सचिन वाझे यांनी आपण स्कॉर्पिओ गाडी वापरलीच नसल्याचा दावा केला होता. मात्र, मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे सचिन वाझे तोंडघशी पडल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या:
अंबानी स्फोट प्रकरणात नंबर प्लेटचा खेळ; वाझेंकडून संभ्रम की स्वत:च गोत्यात?
अंबानींच्या घराबाहेरील ‘ती’ पांढरी इनोव्हा मुंबई पोलिसांची; सूत्रांची खळबळजनक माहिती
(CCTV footage fingerprints NIA technical evidence against Sachin Vaze in Ambani threat case)