Sachin Vaze : सचिन वाझेच्या वापरातील अजून एक अलिशान ‘आऊटलँडर’ गाडी ताब्यात
नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे वापरत असलेली अजून एक अलिशान गाडी NIA ने ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. या गाडीची माहिती मिळाल्यानंतर NIAने ती ताब्यात घेतली आहे.(Outlander used by Sachin Waze was seized by the NIA from a society in Kamothe)
कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पार्क करुन ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाचा व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. NIAला याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, NIAने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित 2 मर्सिडीज, 1 प्राडो, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण 6 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या 6 गाड्यांव्यतिरिक्त एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळतेय.
मिठी नदीत सापडलेलं प्रिंटर विनायक शिंदेचं
या प्रकरणात NIA मिठी नदीत शोधमोहीम राबवली होती. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या शोधमोहिमेत अनेक वस्तू NIAच्या हाती लागल्या आहेत. त्यातील एक प्रिंटर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपी विनायक शिंदेचा असल्याचं कळतंय. तर सापडलेल्या डीव्हीआर पैकी एक डीव्हीआर सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीचा आहे. NIAने केलेल्या चौकशीत वाझे यांनीची ही माहिती दिल्याचं समजतंय.
मुकेश अंबानी यांना देण्यात आलेलं पत्र याच प्रिंटरमधून प्रिंट केलं असल्याचा संशय NIA ला आहे. त्यासाठी आता फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. NIAच्या तपासात दुसरा जो प्रिंटर मिळाला आहे. तो तपासात दिशाभूल करण्यासाठी आणून ठेवण्यात आला असावा, असा संशय NIAला आहे.
विनायक शिंदे आणि नरेश गौरवरही UAPA अंतर्गत कारवाई
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात NIAने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्यावरही UAPA अर्थात Unlawful Activities Prevention Act नुसार कारवाई होणार आहे. हे दोन्ही आरोपी मनसुख हिरेन प्रकरणात सध्या NIAच्या अटकेत आहेत. NIAतील एका अधिकाऱ्याने तशी माहिती दिलीय. त्यामुळे विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ
Video: मिठी नदीच्या पोटात वाझेनं काय काय लपवलं? बघा NIA ला काय काय सापडलं?
Outlander used by Sachin Waze was seized by the NIA from a society in Kamothe