मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय. सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार होणार आहे. त्याचा अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. 100 कोटी वसुली आरोप प्रकरणात सचिन वाझेने सीबीआयसमोर (CBI) काही खळबळजनक खुलासे केले आहेत. यात देशमुख दबाव टाकत असल्याचा जबाब सचिन वाझेने सीबीआयला दिला आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. याच आरोपांमुळे अनिल देशमुख गेल्या काही महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तात्काळ बदली केली. त्यानंतर अनिल देशमुखांनी सचिन वाझेला वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे.
एपीआय सचिन वाझेला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणे आणि मनसुख हिरेन यांची हत्या केल्याच्या प्रकरणात सुरूवातील अटक केली. मात्र जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जाऊ लागला तसतसे अनेक मोठे खुलासे होऊ लागले. यावेळी सचिन वाझेकडे अनेक महागड्या गाड्या सापडल्या. एवढेच नाही तर सचिन वाझेच्या गाडीत तपास यंत्रणांना चक्क पैसे मोजायचे मशीन सापडले. त्यामुळे खळबळ माजली होती.
सचिन वाझे अटक प्रकरणात अनेक खळबळजक खुलासे समोर आल्यानंतर तत्काली गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही उच्चलबांगडी करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकत अनिल देशमुख यांनीच सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा तसेच इतरही अनेक गंभीर आरोप केले.
त्यानंंतर काही दिवसांतच नैतिक जबाबदारी स्वीकारत मी राजीनामा देत आहे, असे सांगत गृहमंत्रिपदाचा अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. तोपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे पोहोचलं होतं. सीबीआयने एकापाठोपाठ एक देशमुखांच्या घरावर धाडसत्र चालवलं. त्यानंतर काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आल्याच्याही बातम्याही आल्या. आता या प्रकरणात पुन्हा सचिन वाझेच्या जबाबाने आणि अर्जाने खळबळ माजवली आहे. त्यामुळे देशमुखांचा पाय आणखी खोलात जाणार आहे.