मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय. (Sachin Waze’s letter bomb, serious allegations against Anil Deshmukh)
महत्वाची बाब म्हणजे सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आलाय.
दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBIला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. 2020 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. पण एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला पुढे ही रक्कम देण्यास सांगितलं.
ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता.
इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलाय.
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
Sachin Waze’s letter bomb, serious allegations against Anil Deshmukh