आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका
Sadabhau Khot Controversial Statement : सदाभाऊ यांनी काल शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर त्यांनी आता या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. हे स्पष्टीकरण देत असताना सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी....
महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झालेला असतानाच सदाभाऊ खोत यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. भाषणात गावगाड्याकडची भाषा वापरल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांंच्या बाबतच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलंय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केलीय. खोतांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्ष लुटारूंची टोळी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणालेत.
राष्ट्रवादीवर टीका
राष्ट्रवादीचा इतिहास बघितला तर हा पक्ष नाही तर ही सरदारांची आणि लुटारूंची टोळी आहे. लुटारू हे गब्बर सिंगसारखे गावात येत असतात. धाक दाखवून गावगाडा लूटत असतात. नाही ऐकलं तर भरचौकात त्या माणसाला फोडत असतात. या सगळ्यातून आम्ही गेलो आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
संजय राऊतांना उत्तर
संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना ‘देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा’ असा उल्लेख केला. त्यालाही सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे. राऊतांना इतकंच सांगेन की कुत्रा हा इमाने इतबारे त्याच्या धन्याची राखण करत असतं. ते खाल्लेल्या अण्णाला जागत असतं. आम्ही आमच्या धन्याची इमाने इतबारे आमच्या धन्याची राखण करत आहोत, याचा सार्थ अभिमान आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान
गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जत विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या सभेतसदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केलं. अरे पवारसाहेब, तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले. बँका हाणल्या. सूत गिरण्या हाणल्या. पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतंया, मला महाराष्ट्र बदलायचाय. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला तुला चेहरा बदलायचाय? कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?, असं विधान सदाभाऊ खोत यांनी काल केलं. त्यांच्या या विधानावर आता प्रतिक्रिया येत आहेत.