सैफ अली खानला चाकूने भोसकले… हल्ल्यानंतरचे 5 प्रश्न अन्… पोलीस तपासात काय काय घडतंय?
या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर आज पहाटे एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानावर चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका व्यक्तीने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. यानंतर तातडीनं सैफ अली खानवर ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे. आता सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर पाच प्रश्न उपस्थितीत होते आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सध्या पोलीस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती कोण होती? त्याची सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर होती का? यात घरात काम करणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी सहभागी होतं का? या हल्ल्यामागचा हेतू काय होता? पोलिसांच्या आरोपीला अटक कधी करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हल्ला कसा घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या असे निष्पन्न झाले की या आरोपीने चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी प्रवेश केला. चोरी करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली असावी. आरोपी हा आप्तकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला. तो जिन्यांवरुन १२ व्या मजल्यावर गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा व्यवस्था नव्हती का?
सैफ अली खान हा वांद्रे पश्चिमेतील उच्चभ्रू सोसायटीत राहतो. सैफ अली खानचे घर १२ व्या मजल्यावर आहे. त्याच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी केली जाते. यात एखाद्या घरात जाण्यापूर्वी तुम्हाला मालकाची परवानगीही घ्यावी लागते. तसेच तुमच्या नावाची नोंदणीही केली जाते. या इमारतीत इतकी काटेकोर सुरक्षा आणि सीसीटिव्हीची पाळत असतानाही हा हल्ला कसा घडला, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. तसेच हा हल्लेखोर जेव्हा इमारतीत शिरला तेव्हा आणि इमारतीतून बाहेर आला, त्यावेळी त्याला कोणीही पाहिले कसं नाही, तो पळून जाण्यात यशस्वी कसा झाला, असे प्रश्नही उपस्थितीत होत आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु केली आहे. सैफच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला पोलीस ठाण्यात आणून तिची चौकशी केली जात आहे. जेव्हा अज्ञात व्यक्ती घरात शिरली, तेव्हा मोलकरणीने सर्वांत आधी त्याला पाहिलं होतं आणि आरडाओरडा केला होता. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर सैफ तिथे आला. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी मोलकरणीच्या हातालाही दुखापत झाली. इमारतीच्या मुख्य गेटजवळील सीसीटीव्हीमध्ये कोणीही येताना किंवा जाताना दिसलं नाही. ही घटना घडली तेव्हा सैफ, करीना आणि त्यांची दोन्ही मुलं घरातच होती.
प्रकृती स्थिर
सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या शरीरावर एकूण सहा वार झाले असून त्यातील दोन वार खोलवर असल्याचं कळतंय. सैफवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याला गुरुवारी रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती, सैफच्या टीमकडून देण्यात आली.