मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे (Sambhaji Raje) राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते. (Sambhaji Raje Chhatrapati will meet MNS cheif Raj Thackeray)
संभाजीराजे यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे.
शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’
(Sambhaji Raje Chhatrapati will meet MNS cheif Raj Thackeray)