महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर

| Updated on: Feb 01, 2024 | 7:35 PM

महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. पण महाविकास आघाडीने त्यासाठी संभाजीराजे यांच्यासाठी एक अट ठेवली आहे. या अटीवर संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडीत स्वराज्य पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर
Follow us on

मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे. पण महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश केला तर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विटरवर (X) ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. याच पक्षाचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

“स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. संभाजीराजे यांच्या या ट्विटमुळे ते आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

मुख्य बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, छत्रपती गादीचे वंशज महाविकास आघाडीत गेल्यास उमेदवारी मिळणार

‘स्वराज्य पक्ष महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो’

महाविकास आघाडी संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यास तयार आहे. पण त्यांच्या स्वराज्य पक्षाला ते महाविकास आघाडीत अधिकृतपणे सहभागी करुन घेण्यास तयार नाहीत. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांनी मविआच्या घटक पक्षापैकी एका पक्षात सहभागी व्हावं आणि आपला पक्ष त्या पक्षात विलीन करावं, अशी अट महाविकास आघाडीने ठेवली आहे. पण या अटीमुळे संभाजीराजे यांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं. संभाजीराजे यांनी मोठ्या प्रयत्नाने हा पक्ष उभा केला आहे. त्यांच्या पक्षाचा आता राज्यात विस्तारदेखील होत आहे. त्यामुळे ते आपला पक्ष कोणत्याही पक्षात विलीन करणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्यांचा स्वराज्य पक्ष महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केलं आहे.