संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
Sandip Kshirsagar- Krushna Aandhale : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात बीड, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे चर्चेत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना फासावर लटकावा अशा भूमिकेवर आपण ठाम असल्याचे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आला. वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला. पण तरीही त्याला अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारी करत आहेत. तर कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा आज फैसला होणार अशी चर्चा कॅबिनेट बैठकीपूर्वीच सुरू होती. त्यातच आज धनंजय मुंडे फ्रंटफुटवर आले. त्यांनी रोखठोक उत्तर देतानाच आक्रमक पवित्रा घेतला.
संदीप क्षीरसागर-कृष्णा आंधळेंचे संबंध
संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळेच क्षीरसागर यांना आंधळे विषयी अधिक माहिती असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीसाठी मुंडे येतील की नाही असा सवाल करण्यात येत होता. दरम्यान ते बैठकीला हजर झाले. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.




मीडियाच्या मायक्रो मायक्रो कॅमेऱ्यांना जे दिसले नाही, ते क्षीरसागर यांना दिसत असल्याने आंधळे आणि क्षीरसागर यांच्यात संबंध असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले. बोलता बोलता ते अचानक मीडियावर घसरले. मीडिया एकांगी बातम्या दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजीनाम्याविषयी थेट प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, त्यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. त्यानंतर आज मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा होती. तर कॅबिनेटच्या बैठकीला मुंडे उपस्थित होते. त्यांनी राजीनाम्याविषयी बाजू मांडली. दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
दरम्यान कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनजंय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी सीएम यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली. सध्याच्या वादावर ही भेट झाल्याने ती महत्त्वाची मानण्यात येत आहे. सध्या बीड हे राज्याच्या नकाशावर आहे. या सर्व घडामोडीनंतर मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय आज तरी झाला नसल्याचे चित्र आहे.