सोलापूर : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अपक्षांना ज्या सूचना केल्या होत्या, त्याचे पालन करून मतदान केले. शिवसेनेच्या कोट्यातून मतदान करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेचे अनिल देसाई आल्याशिवाय आम्ही अपक्ष मतदान केले नाही, असे स्पष्टीकरण करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे (Sanjay MaMa Shinde) यांनी दिले आहे. ते सोलापुरात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना (Uddhav Thackeray) माहीत, असे पलटवार त्यांनी केला आहे. दरम्यान, पराभव का झाला याबद्दल वरिष्ठ नेते मंडळीच सांगतील. आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केल्याचे स्पष्टीकरण संजय मामा शिंदे यांनी दिले आहे.
मी एकटाच अपक्ष आहे असे नाही. अनेक अपक्ष आमदार आहेत. माझ्या नावाची चर्चा तर होतेच आहे. मात्र दोन्ही बाजूने होतच राहणार, असे सांगताना महाविकास आघाडीत अपक्षांकडून मत फुटण्याचा प्रकार घडलेला नाही, असे संजय मामा शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीकडून ज्या ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचे पालन केले. कोणालाही संपर्क करू नका, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पालन केले. मुंबईला गेलो नव्हतो, तेव्हाही माझ्या नावाची चर्चा होत होती.
काही जे घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते विकले गेले. जास्त बोली लागली, असे मला वाटते. त्यामुळे आमचा पराभव झाला. अपक्षांची सहा मते होती, ती आम्हाला मिळाली नाहीत. मात्र महाविकास आघाडीसोबत असलेल्या पक्षांची मते फुटली नाहीत. आम्ही कोणत्याही व्यापारात सहभागी झालो नाही. शब्द देऊन ज्यांनी दगाबाजी केली, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले. हरभरे टाकल्यावर ते कुठेही जातात, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नावाचा उल्लेख करत अपक्षांवर टीका केली.