Sanjay Rathod : अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाली, स्मृतीस्थळी वंदन केल्यानंतर संजय राठोडांची प्रतिक्रिया
कॉलेज जीवनामध्ये आम्ही शिवसैनिक झालो. कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचे विचार मनामध्ये होते. राष्ट्रहित किंवा अन्यायाच्या विरोधात लढणे, हिंदुत्व असे त्यांचे विचार ऐकून आम्ही प्रभावित झालो, असे संजय राठोड म्हणाले.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी आले असता त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच शिंदे गटातील आमदार याठिकाणी आले होते. एकूण 9 मंत्री याठिकाणी आले होते. त्यात संजय राठोड वादग्रस्त असल्याने आणि आरोप असलेले मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रीपदावर विरोधकांकडून (Opposition) टीका होत आहे. या सर्वांविषयी त्यांनी आपली भूमिका आधीच स्पष्टदेखील केली आहे.
‘कॉलेज जीवनापासून शिवसैनिक’
संजय राठोड म्हणाले, की कॉलेज जीवनामध्ये आम्ही शिवसैनिक झालो. कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचे विचार मनामध्ये होते. राष्ट्रहित किंवा अन्यायाच्या विरोधात लढणे, हिंदुत्व असे त्यांचे विचार ऐकून आम्ही प्रभावित झालो. तेव्हापासून राजकारणात आलो. 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही काम केले. बाळासाहेबांच्या विचार आणि आशीर्वादामुळे चार-चार वेळा आमदार बनण्याची संधी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. आज मंत्री झाल्यानंतर त्यांना वंदन करावे, म्हणून याठिकाणी आल्याचे तसेच भविष्यातही त्यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले संजय राठोड आणि दीपक केसरकर?
‘समाजाची भावना होती’
संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समाजाचीही मागणी होती. आरोप सिद्ध झाला तर त्यांना अवश्य काढा, मात्र आरोप सिद्धच झाला नसेल तर आमच्या समाजावर अन्याय करू नका, अशी समाजाची भावना होती, त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. सध्यातरी त्यांचा संबंधित वादग्रस्त प्रकरणात सहभाग दिसत नाही. त्यासंबंधीच्या तपासालाही काही अडथळा येणार नाही, असेही केसरकर म्हणाले. तर कोणत्याही दबावामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतले नसल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.