पत्र काय पाठवताय, थेट कुदळ फावडे घेऊन…औरंगजेबाच्या कबरीप्रकरणात संजय राऊतांनी भाजपाला डिवचले
Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. त्यांनी भाजपच्या नेत्याने खबरीविषयी पत्र व्यवहार करण्यापेक्षा एक मोठे आवाहन केले आहे. काय म्हणाले संजय राऊत?

औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या कबरीविषयी जी भूमिका घेतली, त्याकडे त्यांनी भाजपचे लक्ष वेधले आणि याप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. तर कबर हटवण्यासंबंधी पत्र व्यवहार कसले करता असा चिमटा त्यांनी काढला.
पत्र व्यवहार कशाला? कारसेवा करा
औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिल्याच्या प्रश्नावर त्यांनी खरमरीत उत्तर दिले. कबर हटवण्यासाठी फडणवीस यांना पत्र लिहिण्याची गरज नाही. राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांचे पोलीस आहेत. बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती. देवेंद्र फडणवीस हे कार सेवा करण्यासाठी जाताना नागपूर रेल्वे स्टेशनवरचा फोटो आपण पाहिल्याचा टोला राऊतांनी लगावला.




त्यांनी त्याच पद्धतीने वर्षा बंगल्यावरून बाहेर पडावं. जय श्रीराम अथवा जय भवानी, जय शिवाजी असे वाक्य लिहिलेला रुमाल डोक्याला बांधावा. हातात कुदळ फावडे घ्यावे आणि त्यांचे जे पाच ते सहा वीर आहेत, या सर्वांनी तिकडं जावं, असा चिमटा त्यांनी काढला. ही पत्रबाजीची नाटकं बंद करा असे ते म्हणाले. राज्य तुमचं, कुदळ फावडं तुमचं, पोलीस तुमची, मग तुम्हाला कोणी आडवलं, जा आणि एकदाचा निर्णय करून या असा टोला त्यांनी लगावला.
हे तर पोलीस स्टेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे पोलीस स्टेट झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या अहवालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सूर्यवंशी यांची हत्या झाली असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी घातला. गृहमंत्री यापूर्वी काहीच झालं नाही म्हणत होतं. मग आता कारवाई कुणावर करणार, असा सवाल राऊतांनी विचारला. गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला.