तेव्हा मोर्चकऱ्यांच्या तोंडात बूच का बसले होते?; संजय राऊत यांचा मोर्चेकऱ्यांना सवाल
हिंदू रक्षक शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला. तेव्हा मोर्चेकऱ्याांच्या तोंडामध्ये बूच का बसला होता? शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तिथे हिंदू आक्रोश नाही.
मुंबई: सकल हिंदू समाजाने काल मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता हे कळलंच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. पण केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना मोर्चा काढण्याची गरज काय होती? असा सवाल करतानाच कालचा मोर्चा हा मोदी आणि शाह यांच्या विरोधातील होता, असा दावा संजय राऊत यांनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा मोर्चेकऱ्यांच्या तोंडात बूच का बसले होते? असा संतप्त सवालही राऊत यांनी केला.
ती भाजपची रॅली होती. हिंदू जन आक्रोश नाव दिलं असं काही नव्हतं. कालचा जो काही मोर्चा काढला असा म्हणतात तो कोणी आणि कोणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही. मला वाटतं भाजप महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज आहे. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढला होता, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
तर हे सरकारचं अपयश
महाराष्ट्रात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असेल तर आव्हान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आहे. कारण मोदी, शाह, योगी आदित्यानाथ, देवेंद्र फडणवीस हे सर्व स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे नेते आहेत. दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे.
केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. शक्तीमान नेते आहेत. तरीही धर्मांतरे होत असतील. भाजप सांगतं तसं लव्ह जिहादची प्रकरणे होत असतील तर हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ते बहुधा न्याय मागण्यासाठी ते शिवसेना भवनासमोर अत्यंत व्यथित मनाने जमलेले दिसतात, असा चिमटा राऊत यांनी काढला.
आक्रोश पाहायचा असेल तर काश्मीर जा
हिंदुंचा आक्रोश काय आहे हे पाहायचं असेल तर मोर्चेकऱ्यांनी काश्मीरला जाऊन काश्मिरी पंडितांचा आक्रोश पाहावा. हजारो काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ते घरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वेदना आधी समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
तेव्हा आक्रोश का नाही?
हिंदू रक्षक शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला. तेव्हा मोर्चेकऱ्याांच्या तोंडामध्ये बूच का बसला होता? शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तिथे हिंदू आक्रोश नाही. काश्मीरबाबत हिंदू आक्रोश नाही. राम भक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या मुलायमसिंह यादव यांना मोदींचं सरकार पद्मविभूषण देते. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचा सन्मान नाही.
या सर्व मुद्द्यांवर कदाचित हा हिंदू आक्रोश मोर्चा काढला असेल. हा मोर्चा निघाला तो मोदी आणि शाह यांच्या भूमिकेच्या विरोधातनिघाला असेल. त्यामुळे मी मोर्चेकऱ्यांचं अभिनंदन करतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.