शक्तीप्रदर्शनासाठी अयोध्या कशाला पाहिजे?, ठाण्याचा नाका आहे ना?; संजय राऊत यांनी डिवचलं
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा गट रामाचं दर्शन घ्यायला गेलाच नव्हता. ते शक्तीप्रदर्शनासाठी गेले होते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिंदे-फडणवीस यांच्या या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला आहे. अयोध्येत जायला हरकत नाही. पण श्रद्धा असेल तरच गेले पाहिजे. काल हे लोक तिथे गेले. त्यांनी तिथे शक्तीप्रदर्शन केलं. शक्तीप्रदर्शनच करायचं होतं तर अयोध्येत जाण्याची गरज नाही. ठाण्याचा नाका आहे ना. तिथे करा शक्तीप्रदर्शन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
काल अयोध्येत दर्शनापेक्षा शक्तीप्रदर्शन अधिक होतं. दर्शन आम्ही घेतलं आहे अनेकदा. दर्शन घेताना कालची टोळीही आमच्यासोबत होती. दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातील भेद जाणून घ्या. ज्या रामाची पूजा केली त्यांनी वनवासात जाताना भावाला राज्य दिलं होतं. भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या. रामाचा विचार अंमलात आणला. गद्दारांनी काय केलं? शक्तीप्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे. तुमचा ठाण्याचा नाका आहे ना. तिथेही करता येईल शक्तीप्रदर्शन. तुमच्या विमानात गुंड, मवाली बसले होते. त्याचे फोटो आज प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शुद्ध करण्यासाठी शरयूला घेऊन गेला होता का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
डिग्री आली कुठून?
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडे डिग्री नसली तरी चालेल. त्याने काही फरक पडत नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे डिग्री नसेल तर काही हरकत नाही. पण असेल तर योग्य असावी. नाही तर विद्यापीठे बोगस डिग्रीचे कारखाने होतील, पंतप्रधानांनी डिग्री दाखवली पाहिजे. ते म्हणतात मी विद्यापीठात गेलो नाही. शिकलेलो नाही. मग डिग्री आली कुठून?? असा सवाल राऊत यांनी केला.
त्यावर प्रश्न आहेत
महागाई बेरोजगारी हा विषय आहे. लाखो पदवीधर बेरोजगार आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या संविधानाची शपथ घेतलेल्यांकडे डिग्री असायलाच पाहिजे असा नियम नाही. पण डिग्री आहे म्हटलं जातं तर ती खरी असायला हवी. भाजपने ते स्पष्ट केलं पाहिजे. अमित शाह यांनी मोदींची डिग्री दाखवली. त्यावर प्रश्नचिन्ह आहे. मोदी म्हणतात मी शिकलेलो नाही. माझ्याकडे डिग्री नाही. मग डिग्री आली कुठून? हाच सवाल आहे, असंही ते म्हणाले.