मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा गुजरातमध्ये, संजय राऊत यांनी डिवचले; म्हणाले, आता महाराष्ट्रात काही…
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याने ही टीका करण्यात आली आहे.
मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा गुजरातला जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. अमित शाह यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांची चर्चा होणार असल्याने त्यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला आहे.
गुजरातमध्ये जाणं काही गुन्हा आहे का? गृहमंत्र्यांचं राज्य आहे. शिंदे,फडणवीस यांचे ते राजकीय बॉस आहे. देशाचे मंत्री आहेत. पूर्वी महाराष्ट्रात चर्चा व्हायच्या. महाराष्ट्र दिशा द्यायचा. आता नव्या सिस्टिममध्ये आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुजरातला जावं लागत आहे. गुजरातचे लोक आपले भाऊ आहेत. त्यात काय? आता महाराष्ट्रात काही राहिलं नाही, सर्व बाहेर जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी गुजरातला जावं लागत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
देश जाणतो
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपले गट पक्ष का सोडले याचा संबंध महाराष्ट्राच्या विकासाशी लावू नये असे सांगणं म्हणजे स्वतःशी प्रतारणा करणं आहे. अजित पवारांपासून ते हसन मुश्रीफ आणि इकडे एकनाथ शिंदेंपासून ते भावना गवळींपर्यंत कोणी पक्ष का सोडले? का पळून गेले? हा अख्खा देश, महाराष्ट्र आणि देशाची जनता जाणते, असं राऊत म्हणाले.
मग सत्तेतून बाहेर पडा
आम्हाला सत्तेची हाव नाही असं ते म्हणतात. सत्तेची हाव नाही तर मग कशाला मंत्रीपदाची शपथ घेतली? यातून बाहेर पडा आणि सामाजिक कार्याला वाहून घ्या. तुम्हाला विकासासाठी भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी का हवी? असा सवाल त्यांनी अजितदादांना केला.
लोगोंचं अनावरण होणार
मी इंडिया आघाडीच्या लोगोबाबत बोलणार नाही. तो प्रेरणादायी आहे. त्याचे अनावर 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी होईल. सर्व नेते ग्रँड हयातमध्ये येतील तेव्हा होईल. त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. हा इंडिया आहे. हा भारत आहे. आमच्यावर वार करणं महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.