Sanjay Raut: समोरून लढण्याची हिंमत नसलेल्यांकडून आमच्यावर हल्ला करण्यासाठी उपवस्त्रांचा वापर; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut: हिंदू ओवैसींना सुपारी देऊन राज्यातील शांतता बिघडवली जात आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंगे उतरवण्यासाठी दिलेली डेडलाईन उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. टीका आणि इशाऱ्यांचा सिलसिला सुरू झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तर मनसेला (mns) उपवस्त्राचीच उपमा देऊन जोरदार हल्ला चढवला आहे. माणसांना वापरण्यासाठी ठेवलं जातं त्याला उपवस्त्रं म्हणतात. महाराष्ट्रात असे वापर सुरू आहेत. जे आमच्याविरोधात समोरून लढू शकत नाही. ज्यांच्याकडे हिंमत नाही ते लोक असे छोटेमोठे पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ले करतात. पण अशा हल्ल्यांचा आम्हाला फरक पडत नाही. अशा हल्ल्यांना तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.
हिंदू ओवैसींना सुपारी देऊन राज्यातील शांतता बिघडवली जात आहे. एखाद्या राजकीय पक्षाला राज्यातील शांतता बिघडवायची असेल त्यासाठी त्यांनी कुणाला सुपारी दिली असेल तर अशा लोकांचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकारने अशा लोकांनना शोधलं पाहिजे. काही लोकांना महाराष्ट्रातील जनतेने दूर केलं आहे. त्याचं वैफल्य ते इतरांच्या माध्यमातून काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाहीत. लढायचंच असेल तर समोरून लढा. अशा सुपाऱ्या देऊन काय लढता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री रिलॅक्स आहेत
काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्याशी बराचवेळ गप्पा मारल्या. मुख्यमंत्री रिलॅक्स आहेत. कुणाच्या मनात आलं म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री राज्य सांभाळायला सक्षम आहेत, असं राऊत म्हणाले.
टिळक विरुद्ध फुले वाद निरर्थक
यावेळी राज्यात सुरू असलेल्या टिळक विरुद्ध फुले या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या राज्यात फुलेविरुद्ध टिळक असे वाद लावत असेल तर ते निरर्थक आहे. फुले- टिळकांचे वाद निर्माण करून वादाला फोडणी घालत असेल तर ते योग्य नाही, असं ते म्हणाले.
बेळगावचा मुद्दा संपलेला नाही
यावेळी त्यांनी बेळगाव विषयीही प्रतिक्रिया व्यक्त केली. बेळगावचा मुद्दा संपलेला नाही. एक इंच जमीन देणार नाही असं ते म्हणत आहेत. जमीन काही तुमची नाही. देशाची आहे. बेळगावमधील जनतेवर अन्याय झाला आहे. कोर्टात प्रकरण, असंही त्यांनी सांगितलं.