Sanjay Raut : ‘ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर…’ नारायण राणेंच्या शरद पवारांवरील टीकेवरून संजय राऊत संतापले
संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण राणेंची भाषा अस्वीकारार्ह आहे. शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपाचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीवरून काल प्रतिक्रिया आली होती. एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणेही कठीण होईल, असा इशारा काल नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. आता शिवसेनेतूनही यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संजय राऊत यांचा हल्लाबोल
संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण राणेंची भाषा अस्वीकारार्ह आहे. शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात आणि देशात त्यांचे योगदान सर्वश्रृत आहे. एकीकडे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत 37हून अधिक आमदार आहेत, असा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून त्यांना परत येवून बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अद्याप ते राज्यात परतलेले नाहीत. काल शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावेच लागेल, असे म्हटले होते. त्यावर राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. यावर आता संजय राऊत यांनी पीएमओला उद्देशून एक ट्विट केले आहे आणि सवाल विचारला आहे.
काय आहे ट्विट?
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाहीं@PMOIndia pic.twitter.com/YU1Pc39vCb
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022
काय म्हणाले होते नारायण राणे?
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ द्या. त्यातील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा काल शरद पवार यांनी केला होता. त्यांना मुंबईत तरी यावेच लागेल, असे विधान त्यांनी केले होते. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नारायण राणेंचे ट्विट
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत. मात्र त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे नारायण राणे म्हणाले होते. ट्वीट करत त्यांनी पवारांना लक्ष्य केले होते.