Raj Thackeray : बाळासाहेबांची दुर्मिळ फोटो पाहण्यासाठी राज ठाकरेंना संजय राऊतांचं निमंत्रण, राज निमंत्रण स्वीकारणार?
बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता. त्यांना जसा हवा होता तसा संजय राऊत त्यांनी घडवला. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले. विश्वासघात करायचा नाही,पाठीत खंजीर खुसायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवले, असे म्हणताना त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) हे प्रदर्शन पाहण्याचे निमंत्रणही देऊन टाकले.
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) दुर्मिळ छायाचित्रांचे मुंबईतील जहांगीर दीक्षांत सभागृह फोर्ट कॅम्पसमध्ये प्रदर्शन करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे प्रदर्शन पाहण्यास उपस्थिती लावली. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने मी नेहमी भावूक होतो. बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता. त्यांना जसा हवा होता तसा संजय राऊत त्यांनी घडवला. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले. विश्वासघात करायचा नाही,पाठीत खंजीर खुसायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवले, असे म्हणताना त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) हे प्रदर्शन पाहण्याचे निमंत्रणही देऊन टाकले.
पवार आणि बाळासाहेबांची मैत्री म्हणजे कोडं
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री हे सर्वांना पडलेले कोडे असायचे. एकमेकांवर राजकीय टीका मात्र मैत्री कायम होती. त्यामुळे राज ठाकरे यांना मी आमंत्रण देतो त्यांनी हे छायाप्रदर्शन पाहायला यावे. बाळासाहेब यांनी राजकारण बदलले. दिल्लीतून चालणाऱ्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुबंई ठरवला, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
शरद पवार काय म्हणाले होते?
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला. त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली. आज या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून फोटोग्राफी असोसिएशनने अतिशय उत्तम काम केलं आहे. माझी खात्री आहे की मुंबईकरांसमवेत बाळासाहेबांविषयी आस्था असणाऱ्या लोकांना हे प्रदर्शन पाहून एक वेगळेच समाधान मिळेल. अशी प्रतिक्रिया पवारांनी हे प्रदर्शन पाहून दिली होती.
राऊत संभाजीराजेंबाबत काय म्हणाले?
राज्यसभा निवडणुकीबाबत खासदार संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, संभाजीराजे यांचा आदर आहे. मात्र शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही. ते निवडणुकीत उतरले आहेत याचा अर्थ त्यांनी 42 मतं जमवली असतील. आमच्याकडेही अधिक मते नाहीत त्याची जुळवाजुळव करावी लागते. खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी राऊतांनी दिली.