Sanjay Raut : संजय राऊतांना जबाब देण्यासाठी धमकावलं जातंय, राऊतांच्या वकिलांचा ईडीवर गंभीर आरोप
राऊतांविरोधात राजकीय षडयंत्र सुरू आहे. नवीन आरोप नाहीत. जुन्याच आरोपांबाबत पुन्हा चौकशी आणि कोठडी कशाला हवी, असे मोहिते म्हणाले. मात्र त्यानंतरही न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
मुंबई : संजय राऊतांना (Sanjay Raut) जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे, असा गंभीर आरोप राऊतांचे वकील मनोज मोहिते यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना कोर्टात हजर केले असता संजय राऊत यांच्या वकिलांनी हा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे ईडीने कोर्टात संजय राऊत यांची 10 ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. 5 ऑगस्टला या प्रकरणी काही जणांना समन्स (Summons) बजावले आहेत. त्यांची चौकशी करायची आहे. जे काही व्यवहार संजय राऊत यांच्या खात्यावरून झालेले आहेत, त्याची पडताळणीदेखील करायची आहे, असे ईडीतर्फे कोर्टात सांगण्यात आले आहे. यादरम्यान संजय राऊत यांचे वकील मनोज मोहिते यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
‘दबाव आणि धमकी’
अशोक मुंदरगी यांनी मागील वेळी संजय राऊत यांची बाजू मांडली होती. आता आज मनोज मोहिते बाजू मांडत आहेत. दोन नवीन आरोप करण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीकडून त्यांना पैसे मिळाले तसेच अलिबाग येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र हे आरोप नवे नाहीत. याआधीही या आरोपांप्रकरणी चौकशी झालेली आहे. मात्र ईडीकडून दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, असे मनोज मोहिते यांनी म्हटले आहे.
मनोज मोहितेंचे आरोप काय?
‘अटकेत असताना कसे धमकावू शकतात?’
राऊतांविरोधात राजकीय षडयंत्र सुरू आहे. नवीन आरोप नाहीत. जुन्याच आरोपांबाबत पुन्हा चौकशी आणि कोठडी कशाला हवी, असे मोहिते म्हणाले. मात्र त्यानंतरही न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. साक्षीदार स्पप्ना पाटकर यांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, संजय राऊत आपल्या अशिलाला धमकावत असल्याचे पाटकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, मात्र यावर संजय राऊत अटकेत असताना कसे धमकावू शकतात, असे न्यायालयाने लगेच फटकारले.