‘सिंघम’ फडणवीसांना गृहमंत्रिपदावरून हाकला; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत संतापले
Sanjay Raut on Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. फडणवीसांना गृहमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं राऊत म्हणालेत.
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये काल रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणानंतर मुंबईमध्ये घबराट पसरली आहे. यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सिंघम’ फडणवीसांना गृहमंत्रिपदावरून हाकला, अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला आहे.
राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणुका जिंकल्या म्हणून पेढे वाटतात. पेढे खा तुम्ही, पण ती दहशत सुरू आहे, खंडणी सत्र सुरू आहे, अशावेळी गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही. राज्यातील इतिहासातील सर्वात अपयशी निष्क्रिय गृहमंत्री आहेत. आता गृहमंत्र्यांचा राजीनामा द्या मागत होतो. आता गृहमंत्र्यांना हकला. असं सांगण्याचीवेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि काय झाले. त्यांचं अधपतन झालं आहे. विरोधांबाबत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा- राऊत
कालची घटना दुर्देवी आहे. आमची सुरक्षा काढून घेतली. हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. बाबा तुमच्या आघाडीत असताना त्यांना मारण्यात आलं. भविष्यात कारणं उघडे होतील. हत्या झाली, मुंबईत झाली, भरवस्तीत झाली, यावर गृहमंत्र्यांनी खुलासे करू नये. त्यांना खंत वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. किंवा राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
बाबा सिद्दिकी काँग्रेसचे दीर्घकाळ नेते राहिले आहेत. त्यांची हत्या झाली. त्यांना सुरक्षा व्यवस्था होती. वाय दर्जा होती. त्यांच्या आजूबाजूला माणसं होती. एका कार्यक्रमातून बाहेर पडले होते. त्यांना मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या. मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे. त्या हत्या माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या. या राज्यात कोण सुरक्षित आहे. हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. सामान्य माणसं, महिला, व्यापारी सुरक्षित नाही, आता राजकीय कार्यकर्ते., आमदार, नेते सुरक्षित नाही. राज्यकर्ते काय करत आहेत?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.