शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपचाच; संजय राऊतांचा शाब्दिक हल्ला
Sanjay Raut on BJP and Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शिवरायांबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपचा आहे, असं ते म्हणाले, वाचा...
शिवरायांनी सुरत लूट केलीच नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर कठोर शब्दात टीका केली आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपचाच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणातले आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाहीत ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
भाजपवर निशाणा
आताच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रेम नाही. कदाचित कार्यालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा काढून अदानीचे फोटो, पुतळे लावतील ही अवस्था झाली आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रफुल्ल पटेल अशा अनेकांनी महाराजांचा अपमान केला. हे सगळे भाजपचे प्रॉडक्ट आहेत. अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपमध्ये आहे, यावरून भाजपचं शिवारायांवरचं प्रेम पाहा…, असं संजय राऊत म्हणाले.
अदानींचं नाव घेत भाजपवर टीकास्त्र
मुंबई विमानतळ अदानींच्या म्हणजे भाजपच्या ताब्यात गेल्याने तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. शिवरायांच्या पुतळ्यावरचा जिरे टोप तुटलेला आहे. यावर भाजपचे तथाकथित बोगस शिवभक्त, स्वतःला हिंदूचे कैवारी म्हणणारे मिंधे गटाचे लोकांचं काय म्हणणं आहे? मुंबईत अशाप्रकारे शिवपुतळ्याची विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपतींकडून होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब आहे, असं संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. भाजपचे मिंधे गटाचे नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वाभिमान शिकवला तो यांच्याकडे नाही. त्यामुळे लाडक्या उद्योगपतीकडून होणारा महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यानी हे लोक पाहात आहेत. आमचे शिवसैनिक तिथे पुतळा सोडविण्यासाठी गेले. अदानींनी 200 बाऊन्सर्स तैनात केलेत. ते आमच्या सैनिकांवर चाल करुन आले. हेच लोक हिंदुत्वाबद्दल बोलताता. शिवरायांचं नाव घेत भाषणं करतात. यांना लाज वाट्याला हवी. आम्ही तो पुतळा बाहेर काढला. स्थापना केली. आमच्या काळात मुंबई विमातळावर महाराजांचा भव्य पुतळा उभा राहीला, असं संजय राऊत म्हणाले.