‘लाडकी बहीण योजना’ वरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं; नरेंद्र मोदींचं नाव घेत म्हणाले, बोगस…
Sanjay Raut on Ladki Bahin Yojna : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी 'लाडकी बहीण योजने'वरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले? वाचा सविस्तर...
राज्य सरकारने काही दिवसांआधी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेचा लाखो महिलांनी लाभ देखील घेतला आहे. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. याच योजनेवरून विरोधी पक्ष मात्र सरकारला घेरत आहे. 1 हजार 500 रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, अशा शब्दात शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता लागली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये योजना बोगस कशी? हे भाजपच्या लोकांचं सडक डोकं आहे. मी पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. पण मोदींचं हे विधान आहे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंवर निशाणा
राज्यात निवडणुका कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवणार नाहीत. तर निवडणूक आयोग सांगेल. मोदी- शहांच्या आदेशानंतर निवडणुक आयोग निवडणुका जाहीर करेल. भाजपच्या सांगण्यानुसार निवडणुका होणार आहेत. राज्यातील 14 प्रमुख महापलिकांच्या निवडणुका होत नाहीयेत. या निवडणुका तेव्हाच होतील, जेव्हा त्यांना विश्वास येईल. शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार घेतला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
बंगला, रहस्य अन् ‘भूत बंगला’, संजय राऊत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस जातात तिकडे त्यांना बंगला मिळत आहे. त्यांचं आणि बंगल्याचं काय रहस्य आहे मला कळत नाही… महाराष्ट्रात मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो. इथे तर त्यांनी तीन तीन बंगले घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तीन बंगले घेतलेत. दिल्लीत बंगला वाटप सुरू आहे. त्याचा एकदा ‘भूत बंगला’ होणार आहे. एवढे बंगले घेतले आहेत. निवडणूक हरल्यावर सर्व भुतासारखं फिरणार आहेत. कशाला आणि मला कळत नाही यांना एवढे बंगले देत आहेत. भाजपचं सगळंच कठीण आहे, असं संजय राऊत म्हणाले.