विधानसभेच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता आज शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भाजप आणि विशेषत : अमित शाह यांच्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद झाला आहे. त्यानंतर आता काल 10 तास बैठक झाली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. उशीर झाल्यास हे लोक राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावतील. राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा अमित शाह यांचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
भाजप जिथं लढणार आहे. त्या 150- 155 जागांवर जे पक्के मतदार आहेत. ज्यांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. त्यांची नावं मतदार यादीतून काढायचा प्रयत्न सुरु आहे. त्या ऐवजी 10 हजार बोगस नावं टाकायचा प्रयत्न आहे. खोटे आधार कार्ड, मतदान ओळख पत्र यांच्या आधारे बोगस नावं टाकली जात आहेत. केवळ भाजपचे उमेदवार असणार, तिथे हे सगळं चाललं आहे. जे अत्यंत गंभीर आहे, असं राऊत म्हणाले.