Sanjay Raut : नवीन संसद, छे ते तर स्विमिंगपूल; राम मंदिराला पण लागली गळती, संजय राऊत यांनी केंद्रावर धरला निशाणा, या टीकेने विरोधकांना झोंबणार मिरच्या
Sanjay Raut on Modi Government : मुसळधार पावसाने दिल्लीतील अनेक कामांचा दर्जा उघडा केला. नवीन संसदच्या इमारतीच्या लॉबीमध्ये गळती झाली. तर आवारात पाणी शिरले, त्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.
मुसळधार पावसाने दिल्लीतील दाणादाण उडाली. त्यात नवीन संसद इमारतीला पण सोडले नाही. या इमारतीच्या लॉबीत पाणी गळायला लागले. तर आवारात पाणी साचले. त्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रसेच्या खासदारांनी तर या गळतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी पण मोदी सरकारवर जळजळीत टीका केली. त्यांच्या या टीकेने सत्ताधाऱ्यांना मिरच्या झोंबल्याशिवाय राहणार नाही.
राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
जुनी इमारत सुस्थिती होती. ती अजून अनेक वर्षे चालली असती. त्यात कामकाज होऊ शकले असते. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्या आहेत. ही इमारत बांधून एक वर्ष होत आहे. तर राम मंदिर बांधून एक वर्ष झाले आहे. पण एकाच पावसात नवीन संसद इमारतीला गळती लागली. आमच्या कार संसद आवारात आल्या त्यावेळी पाणी होते. राम मंदिरात पाणी गळत आहे. पावसामुळे विमानतळात पडझड झाली. सरकार आहे कुठे? असा प्रश्न त्यांनी विचारला. ठेकेदारांना काम दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. या ठेकेदारांचा आणि सरकारचा हिशोब झाला पाहिजे, हे ठेकदार कोण आहेत. ते कोणत्या राज्यातील आहे हे एकदा समोर आले पाहिजे. कोणाला किती कमिशन मिळाले याचा हिशोब झाला पाहिजे असा घणाघात त्यांनी घातला.
ही तर लाडक्या बहिणीची फसवणूक
विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील असा जिव्हारी लागणारा टोला त्यांनी हाणला. लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा तिजोरीतील आहे. तर फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा पैसा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.