VIDEO: पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय?; राऊतांचा सवाल
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. (Sanjay Raut reaction after modi government fuel price cut)
मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का? असा संतप्त सवाल करतानाच 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं, असं राऊत म्हणाले.
50 रुपयांनी दरवाढ कमी करा
केंद्र सरकारने अत्यंत किरकोळ दरवाढ कमी केली आहे. ही एक प्रकारे नागरिकांची चेष्टाच आहे. या सरकारकडे मोठं मन नाही. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार? असा सवाल करतानाच पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?, असा सवाल राऊत यांनी केला.
हे मोठ्या मनाचं लक्षण का?
पेट्रोल-डिझेलचे भाव 100 रुपयांनी वाढवले हे पण मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100 ते 150 रुपयांची दरवाढ करू शकतात. लोकं पेट्रोल पंपावर आता 15 रुपये आणि 20 रुपयाचं पेट्रोल घेत असतात. समोर मोदींचा फोटो असतो. मोदी त्यांना आशीर्वाद देतात. आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असं सांगत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
तुमच्या मुख्यमंत्र्यांची बोटं छाटणार का?
राज्यात कोणतंही संकट आलं तर केंद्राकडे नाही तर कुणाकडे बोट दाखवायचे? असा सवाल त्यांनी केला. केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल ना. पेट्रोल-डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कुणाकडे बोट दाखवलं? त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना? भाजपचेच, असं ते म्हणाले. तुम्हीच मायबाप ना? देशाचे धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता ना? मग बोट कुणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं की बायडनकडे दाखवायचं? कुणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडे दाखवायचं? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार काय?; चंद्रकांतदादा म्हणतात, मी आशावादी नाही
(Sanjay Raut reaction after modi government fuel price cut)