Sanjay Raut : लोकसभा निवडणूक लढणार काय?, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पक्षाने आदेश दिल्यावर निवडणूकच काय…
जे टाटांना पुरस्कार द्यायला गेले. त्या हाताने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटला आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी राज्यसरकारवर केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय राऊत निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आहे. या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनीही त्यावर सूचक विधान करून या चर्चांना हवा दिली आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणूकच काय आम्ही तुरुंगातही जातो, असं सूचक आणि मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे ईशान्य मुंबईतून भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या विरोधात लढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो. आदेश आल्यावर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश जो असेल ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ईशान्य मुंबईत राऊत सोडून द्या साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.
ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला
ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या मदतीने सातत्याने भाजपचा उमेदवार ईशान्य मुंबईत निवडून आला आहे. त्यामुळे इथे आमच्यातील साधा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि कोणीही उभा केला तरी ईशान्य मुंबईत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
ते पवारच करू शकतात
दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आला ना? हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी बोलणार नाही. शरद पवार प्रमुख नेते आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना जे पदं मिळाली ते शरद पवार या नावामुळेच. त्यांच्या प्रतिष्ठेमुळेच. नाही तर आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला नसता. छगन भुजबळ तुरुंगातून आल्या आल्या मंत्री झाले नसते. हे सर्व शरद पवारच करू शकतात, असं राऊत म्हणाले.
सत्य स्वीकारलंच पाहिजे
सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल असतील या सर्वांना पवारांनीच घडवलं. जसं बाळासाहेब नसते तर आम्ही कोण असतो? शेवटी जो प्रमुख नेता तोच घडवतो सर्व. तो किती लहान, त्याचा पक्ष किती लहान हे नंतरच्या गोष्टी आहेत. आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांमुळेच आहोत. आज राष्ट्रवादीचे नेते इकडे तिकडे खुर्च्यांवर बसले आहेत ते केवळ शरद पवार यांच्यामुळेच आहे. आजचा भाजप हा मोदींमुळे आहे. हे सत्य आहे. ते स्वीकारलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाण्यावर मालकी सांगता ना?
ठाण्यातील मृत्यू प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा प्रश्न दादाचा नसून महाराष्ट्राचा आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. अनेक वर्ष मंत्री आहात. त्या आधी अनेक वर्ष ठाणे महापालिका सांभाळली आहे. ठाण्यात एका रात्रीत 24 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अजितदादा कशाला? हा जनतेचा प्रश्न आहे. तुमचं ठाणं आहे ना? ठाण्यावर तुम्ही मालकी सांगताना ना? मग कारणं सांगा. तुम्ही महाराष्ट्र घडवायला निघाला पण ठाण्यातील मृत्यू रोखू शकला नाही, असंही ते म्हणाले.