नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या आरोपाने खळबळ उडाली आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी करण्याचा छंदच आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यात खूप फरक आहे, असंही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी करण्याची सवय लागलीय. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. त्यांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का जडला मला माहीत नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो. चर्चा करत असतो. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जात होते. अशावेळी सरकार बनवू इच्छितात त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले असतील. बोलू शकतात. फडणवीस इतक्या दिवसानंतर सनसनाटी निर्माण करून काय साध्य करू इच्छितात ते पाहावं लागेल?, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही. दिल्ली की मर्जी है ये. ठिक आहे. सनसनाटी एन्जॉय करा, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
कसब्यात पोलिसांमार्फत पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात अनेक काळापासून निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैसे वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. मागच्या काळात बारामती आणि पुणे भागात पोलिसांच्या मदतीने पैशांचं वाटप करण्यात आले होते. पोलिटिकल एजंट म्हणून पैसे वाटतात हे पुराव्याने सिद्ध झालं आहे.
सुरक्षित पैसे वाटप कोण करू शकतो? पैशाची देवाणघेवाण आवकजावक हे पोलिसांच्य गाड्यातून केल्या जात आहे. पाच वर्षापूर्वीच हे उघड झालं आहे. कसब्याचे उमदेवार रवींद्र धंगेकरांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. भाजपच्या कालखंडात पोलिसांच्या वाहनातून आवक जावक झालीय. त्यामुळे विश्वास ठेवावा लागेल, असं राऊत म्हणाले.
देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. 2024ची तयारी आम्ही हळूहळू सुरू केली आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आले. चर्चा केली. राष्ट्रीय राजकारणावर काही भूमिका ठरवल्या आहेत. त्या भविष्यात समोर येतील. केजरीवाल लढवय्ये नेते आहेत. त्यांचाही राज्यपाल आणि केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून छळ केला जातो. दिल्ली पालिकेत बहुमत असतानाही त्यांचा महापौर होऊ दिला जात नाही. आम्ही सर्व संघर्ष करू. पुढे जाऊ, असं ते म्हणाले.