देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ सडकून टीकेवर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर; नवाज शरीफ यांचा मुद्दा उकरून काढला
मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन बसले आहेत. खरंतर मोदींनीच सर्व पक्षीय बैठक बोलवायला हवी होती. आज जी बैठक होत आहे, ती यापूर्वीच घेता आली असती. दोन महिन्यानंतर ही बैठक होत आहे.
मुंबई : मेहबूबा मुफ्तीवरून टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे आज मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसले आहेत, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मेहबूबा मुफ्ती या विरोधकांच्या बैठकीला आल्या होत्या. ही बैठक पाटण्यात होती. जम्मू-काश्मीरमध्ये नाही. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये गेलो नव्हतो, असं सांगतानाच आमच्यावर बोलताना जपून. आम्ही काही नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेलो नव्हतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हणे काल सडकून टीका केली आहे. काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्या मुफ्तीबरोबर आपण सरकार बनवलं. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. सडकून टीका करताना जपून करा. आम्ही काय नवाब शरीफ यांचा केक कापला नाही? किंवा मुफ्तीच्या सरकारमध्ये गेलो नाही. ते तुमचंच भूत आहे. तुमचंच पाप आहे. तोंडाच्या वाफा दडवू नका. भविष्यात या विषयावर बोलूच. उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देईलच, असं संजय राऊत म्हणाले. मुफ्ती यांच्या मुद्द्यावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. पीओके भारताला जोडण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते कुठपर्यंत आलंय ते पाहा, असा चिमटाही त्यांनी काढला.
देश जळतोय आणि मोदी…
राऊत यांनी यावेळी मणिपूरच्या हिंसेवरून भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शाह गृहमंत्री असूनही लोहपुरुष असूनही मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकले नाहीत. हे या सरकारचं अपयश आहे. मणिपूरबाबत पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. पण मोदी अमेरिकेत आहेत. देश जळतोय अन् मोदी अमेरिकेत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
इंफाळला बैठक घ्या
केंद्रीय गृहमंत्र्याने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी जातील. पुढील सर्व पक्षीय बैठक मणिपूरमधील इंफाळमध्ये घ्यावी. इंफाळमध्ये पुढील बैठक घेऊन मणिपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्षांशी चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच आजच्या बैठकीत आमचे मुद्दे मांडू. दोन महिन्यानंतर बैठक होत आहे. ही बैठक आधीच व्हायला हवी होती. हे या सरकारचे डाव आहेत. या सरकारमध्ये हिंमत नाही, असंही ते म्हणाले.
तर शेवटची निवडणूक असेल
कालच्या विरोधी पक्षाच्या मिटिंगचं फलित एवढंच की आम्ही देशभक्त विरोधक एकत्र आलो आहोत. 2024मध्ये आम्ही देशात परिवर्तन घडवू. 2024 मध्ये सत्ता परिवर्तन नाही केलं तर 2024ची निवडणूक शेवटची असेल. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावे लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीत सांगितलं, असं त्यांनी सांगितलं.