‘संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला’, ‘सामना’तून सुशांत सिंहच्या आत्महत्येवर रोखठोक भूमिका
संजय राऊत यांनी सामनातून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Rajput Suicide).
मुंबई : सामनाच्या कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Rajput Suicide). यात त्यांनी आगामी काळात जॉर्ज फर्नाडिस यांच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंह राजपूत हा संभाव्य ‘जॉर्ज’ म्हणून डोक्यात असल्याचाही मोठा खुलासा केला. त्यांनी रोखठोक सदरातील ‘सुशांतच्या आत्महत्येस कारण की…’ या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरही ताशेरे ओढले.
संजय राऊत म्हणाले, “‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर ‘बायोपिक’ करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून 2-3 अभिनेत्यांची नावे समोर आली, त्यात सुशांतचे नावही होते. धोनीच्या जीवनपटामुळे तो माझ्या नजरेत होता. पण 2 दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. तो ही भूमिका लीलया पेलेल. पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटांच्या सेटवर त्याचे वर्तन तऱ्हेवाईक असते. याचा सगळ्यांना त्रास होतोय. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले. सुशांतने स्वतःच स्वतःच्या करिअरची वाट लावली, असे या जाणकाराचे सांगणे होते. त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला.”
सुशांतची आत्महत्या खून नाहीच
संजय राऊत यांनी आपल्या लेखात सुशांत सिंहची आत्महत्या हा खून असल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं. तसेच हा खून नसून केवळ आत्महत्या असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे हा खून नाही. त्याने सरळ स्वतःच्या घरात आत्महत्या केली. आता काही उपप्रश्न येतात. सुशांत हा गेले काही दिवस मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होता. या काळात त्याने मानसोपचार तज्ज्ञ बदलले पण उपयोग झाला नाही. सुशांतने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली नव्हती. तरीही सुशांतशी संबंधित अनेक महिला व उद्योगातील लोकांची रोज 11-11 तास चौकशी सुरुच आहे. ती कशासाठी?”
“सुशांतकडे काम नव्हते हे खोटे ठरत आहे. त्याची आर्थिक स्थितीही उत्तम होती. तो राहात असलेल्या घराचे भाडे 5 लाखांच्या आसपास होते. त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या. तो महिन्याला 10 लाख रुपये खर्च करत होता असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे तो त्याचा आनंद घेत होता. माझ्या वाचनात आले की, प्रत्यक्षात यश राज प्रोडक्शनने सुशांतशी केलेल्या कराराचा पोलीस तपास करत आहेत. या कराराच्या प्रती पोलिसांनी मागवल्या आहेत. या करारांतून कोणते धागेदोरे मिळणार आहेत?” असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे किमान 10 अभिनेत्रींशी संबंध उघड”
संजय राऊत म्हणाले, “सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे कोणत्या अभिनेत्रीशी कसे संबंध होते ते प्रसिद्ध झाले. किमान दहा अभिनेत्रींचे संबंध उघड झाले व त्यातील काही अभिनेत्रींना पोलिसांनी सतत चौकशीसाठी बोलावले. याची गरज नव्हती. 34 वर्षांचा एक अभिनेता वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर संबंध ठेवतो. त्यातील अनेक मुलींशी त्याचे ब्रेकअप झाले होते आणि पुढे हा सुशांत वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतो. त्याच्याकडे वैभव होते, कीर्ती होती. जगण्याचे साधन होते, पण त्याच्या गाडीला ब्रेक नव्हता.”
“सुशांत हा अभिनेता होता व निराशेच्या गर्तेत इतरजण मरण पत्करतात तसे त्याने पत्करले. त्याचे काही निर्मात्यांशी व बड्या कलावंतांशी संबंध बिघडलेले असतील, पण आज त्याच क्षेत्रात आयुषमान खुरानापासुन नवाजुद्दीन सिद्दिकीपर्यंत असंख्य कलाकार पाय रोवून उभे आहेत. आपले बाप बडे कलाकार आहेत म्हणून अनेक स्टारपुत्र पडद्यावर चालले नाहीत. शाहरुख खान, सलमान खानचे सिनेमेही कोसळत आहेत. नव्या कलाकारांचे सिनेमे चालत आहेत. त्यात सुशांत राजपूतही होताच, असं राऊत म्हणाले.
उत्सवी आत्महत्या
संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येला दिलेल्या महत्त्वावरुनही टीका केली. ते म्हणाले, “सुशांतची आत्महत्या हे उत्सवाचे एक निमित्त आहे. त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱ्हाळाचा बिंदू आहे.”
आत्महत्येचे मार्केटिंग!
संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येचं मार्केटिंग केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “एखाद्याच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा ‘उत्सव’ कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही ‘मार्केटिंग’ कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणून सुशांतसिंह प्रकरणाकडे पाहता येईल. जो उठतोय तो या प्रकरणात हात धुऊन घेतोय. त्याची दोन उदाहरणे. सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याने त्याचा लाडका कुत्रा ‘फज’ याला प्रचंड धक्का बसलाय. सुशांतच्या प्रिय फजने मालक गेल्याच्या दुःखाने खाणे-पिणेच सोडले व त्यानेही दुःखाने मृत्यूस कवटाळले ही बातमी प्रसिद्धी माध्यमे व सोशल माध्यमांत पसरली. नंतर ‘फज’ जिंवत असून असे काहीही घडले नसल्याचा खुलासा झाला. सुशांतच्या आत्महत्येनंतर पाचव्या सहाव्या दिवशी राखी सावंत या अभिनेत्रीने आणखी एक विनोद केला. तिने स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सांगितले, काल रात्री सुशांत तिच्या स्वप्नात आला. सुशांतने तिला झोपेतून जागे केले व सांगितले, ‘बाई तू लग्न कर, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे !'”
“सुशांत आत्महत्येचे हे साईड इफेक्ट आहेत. सिनेमाच्या पडद्यावर पूर्वी ‘स्पेशल इफ्केट’ नावाचा प्रकार होता. आता हे सुशांत इफेक्ट आहेत. एखाद्याला मृत्यूनंतरही सुखाने जगू देत नाहीत. सुशांतच्या छळलेल्या आत्म्यालाही डिप्रेशन यावे असे हे प्रकार आहेत. ते आता तरी थांबवावेत,” असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण…..
Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय
Sanjay Raut on Sushant Singh Rajput Suicide