Sanjay Raut on Fadnavis: मेवाणींना अटक करून पुन्हा अटक हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण?; राऊतांचा फडणवीसांना सवाल
Sanjay Raut on Devendra Fadnavis: संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना आरसा दाखवला.
मुंबई: मुंबईसह राज्यातील घटना पाहिल्यानंतर, या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय, असं आम्हाला वाटत नाही. जर कुणी हिटलरी प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले हे मी कालच सांगितल होतं. त्यामुळे हुकूमशाही काय आहे. कायदा सुव्यवस्था कोसळणं काय असतं हे आपण उत्तर प्रदेशात पाहिलं पाहिजे, असं सांगतानाच जिग्नेश मेवाणींना (jignesh mevani) आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. मेवाणी यांनी मोदींविरोधात ट्विट केलं म्हणून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका झाली. पण अटक करून पुन्हा अटक केली. हे कोणतं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. मेवाणींची अटक होते. सुटका झाल्यावर पुन्हा अटक होते, त्यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे, टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना आरसा दाखवला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर केला जातो. न्यायालयावर कसा दबाव आणला जातो, अनेक राज्यात विरोधी पक्ष कसा दबावाखाली आहे यासह मानवी हक्कासंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे फडणवीस कोणत्या हिटलरशाही विषयी बोलतात हे समजून घ्यावं लागेल. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याला लोकशाहीची चिंता असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांची भूमिका फक्त महाराष्ट्रापुरती नसून देशाची आहे. संपूर्ण देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे का अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही बोलू त्यांच्याशी, असा चिमटा राऊत यांनी काढला.
फडणवीस दिशाभूल करत आहेत
राणा दाम्पत्यांवर हनुमान चालिसा म्हटल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. फडणवीस दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसा म्हटल्याने कुणावर गुन्हा दाखल झाला नाही. ते वकील आहेत. त्यांनी कोर्टाचं जजमेंट वाचावं. तुमचं मन अशांत असेल तर तुमच्या घरात किंवा मंदिरात हनुमान चालिसा वाचा. दुसऱ्यांच्या घरात वाचू नका, असं राऊत म्हणाले.
त्यांनी फार खाजवत बसू नये
भोंग्यांसदर्भात काल झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची गरज नव्हती. तो गृहखात्याचा विषय होता. विरोधी पक्षाला काहीना काही खाजवण्याची सवय आहे. सतत खाजवत असतात. त्यामुळे त्यांची चामडी फाटणार आहे. त्यांचे बुरखेच फाटणार आहेत. त्यांनी फार खाजवत बसू नये. कायदा सुव्यवस्थे संदर्भात सरकार काही निर्णय घेत असेल तर बैठकीत सहभागी व्हावं. आदर्श विरोधी पक्ष असल्याचं दाखवून द्यावं. तुमचीच मागणी होती ना मग बहिष्कार कसा टाकता? त्यांना अराजकता निर्माण करायची आहे. गोंधळ करायचा आहे. त्यालाच राजद्रोह म्हणतात. उत्तर प्रदेशात अशा लोकांवर भाजपच्या सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.