News in Marathi : तुमची मस्ती होती… तुमचा XX शमविण्यासाठी हे केलं; संजय राऊत भडकले
मराठा आरक्षण ते खारघरच्या प्रकरणापर्यंतच्या विविध मुद्द्यावरून पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. यावेळी राऊत यांनी राज्य सरकारवर जळजळीत शब्दात टीका केलीय.
मुंबई : खारघर येथील उष्माघाताच्या मृ्त्यूप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कार्यक्रमाच्या स्थळीच्या शामियानाची, त्या शामियानात उठलेल्या जेवणावळीची चौकशी करणार आहे काय? असा सवाल करतानाच या घटनेवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावं, अशी मागणी संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.
खारघर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही सरकारी समिती आहे. मी अधिकाऱ्यांवर टीका करणार नाही. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या विषयावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घेण्याची भूमिका मांडलीय. त्याच्याशी मी सहमत आहोत. मृतांचा आकडा जास्त आहे. तो 50च्या आसपास असावा अशी भीती व्यक्त होत आहे. लोकं उन्हात तडफडून मरत आहेत. पोस्टमार्टमचा अहवाल आला आहे. त्यात मृतांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता असं म्हटलं आहे. शामियानात जेवणावळी उठतानाचे फोटो दिसत आहेत. हे सर्व चौकशीत घेणार आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
सांस्कृतिक मंत्री आहेत कुठे?
कार्यक्रमाच्या ठिकाणी सावली नव्हती. कारण गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? ही तुमची मस्ती होती. तुमचा कंडू शमवण्यासाठी तुम्ही हे केलं. कसल्या शाही मेजवाण्या झोडत आहात? लोकं तडफडून मेली. एक सदस्यीय समिती शाही मेजवानी आणि शाही शामियानाची चौकशी करणार आहे का? लोकप्रतिनिधींना विधानसभेत बोलण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येकाकडे माहिती आहे. दोन दिवसाचं अधिवेश घ्या. साधूकांड झाल्यावर अधिवेशनाची मागणी केली होती ना? फडणवीसच ही मागणी करत होते. मग आता खारघर दुर्घटनेची चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच सांस्कृतिक मंत्री आहेत कुठे? परदेशात गेले का? चेक करा. का गेले परदेशात माहिती द्या, असंही ते म्हणाले.
तुम्ही किर्तन करताय का?
काही लोक सकाळी सकाळी अभंग गात असतात अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा. आमचा अभंग आणि तुमचं किर्तन. तुम्ही किर्तन करताय का? तुम्ही करताय ते थोतांड आहे. अभंगाची चेष्टा करू नका. टाळ तरी वाजवून दाखवा. तुम्ही फक्त बेईमानांच्या चिपळ्या वाजवत आहात. आमचा अभंग अन्यायाविरोधात आहे, असं त्यांनी ठणकावलं.
ती कंपनी कुणाची?
खारघरला जो प्रकार घडला तो का घडला? हिंमत असेल तर समोर येऊन सांगा. खारघरच्या कार्यक्रमाचं लाइट अँड शेअर्स कंपनीला कंत्राट दिलं. ती कंपनी कुणाची आहे? त्याचे पार्टनर कोण आहेत? साडे चौदा कोटीचं टेंडर काढलं. नंतर काम दिलं. या कंपनीने मिंधे गटाचं काम कुठे कुठे केलं आहे. मी माहिती देतो. अयोध्येत इव्हेंट अॅरेजमेंट करायला कोणती कंपनी होती? याची माहिती चिपळ्यांनी महाराष्ट्राला द्यावी. आमचा अभंग सुरूच राहील, असा हल्लाही त्यांनी चढवला.
आरक्षण का दिलं नाही?
फडणवीस विरोधी पक्षनेते असताना सतत सांगत होते आमच्या हातात सत्ता द्या दोन दिवसात मराठा आरक्षण देतो. न्यायालयात विषय आहे, हा विषय नंतर. दोन दिवसात आरक्षण देतो, असं फडणवीस म्हणत होते. न्यायालयात काय होतंय याची आम्ही तेव्हापासून आम्ही वाट पाहत होतो. इतर सर्व निकाल न्यायालयात मॅनेज होतात. इलेक्शन कमिशन मॅनेज होतं. मग हा महत्त्वाचा विषय आहे. एका महत्त्वाचा समाजाचा विषय आहे. त्यांना आरक्षण का दिलं नाही? मनासारखा निकाल का लावून घेतला नाही? असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही कुठे कमी पडलाय?
मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. त्यावर मी नंतर बोलतो. पण सत्ता द्या, आरक्षण देतो असं फडणवीस सांगत होते. धनगर आरक्षण असो, मराठा आरक्षण असो किंवा अन्य समाज असतील. आता काय झालं? तुमच्या हातात 9 महिन्यापासून सत्ता आहे. सीमा प्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल लागत नाही. का तुमची पावलं का पडत नाहीत त्या दिशेने? तुमची दातखिळी का बसली आहे त्या विषयावर? शिवसेना आमच्या हातून काढून घेण्यासाठी तुमच्या हालचाली बरोबर असतात. सर्वोच्च न्यायालयातून सत्ता संघर्षाबाबत हवे ते निकाल घेता. मग मराठा आरक्षणाबाबत तुम्ही कुठे कमी पडलाय? तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं, असं आव्हानच त्यांनी दिलं.