तुम्ही कोण लॉर्ड फॉकलंड लागून गेला?, जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊत कडाडले
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं आहे. परदेशात बसून प्रवचने देऊ नका. तीन महिन्यात निर्णय घ्या. लोकशाहीच्या चौकटीत निर्णय घ्या. राज्यपालांनी अब्रू घालवली. तुम्ही तसं करू नका, असा राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : आमदार अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फैलावर घेतलं आहे. निर्णय घेण्यासाठी आम्हाला अमर्याद वेळ आहे, असं नार्वेकर म्हणतात. पण वेळेचं बंधन असतं. तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागतो. न्याय व्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत निर्णय द्यावा लागतो. वेळेचं बंधन असतं. तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून चालला आहात? इथे ब्रिटिशांचा कायदा चालत नाही. हे भारतीय संविधान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी नार्वेकर यांना सुनावले आहेत. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राहुल नार्वेकर हे परदेशात बसून शिवसेनेचे 16 आमदार कसे अपात्र होतील याची प्रवचने देत आहेत. पक्षांतराचा त्यांचा इतिहास आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं फक्त पालन करतो. नाही तर महाराष्ट्र काय आहे हे दाखवावे लागेल. ही धमकी नाहीये. परत म्हणतील धमकी देतात. कायद्याचं पालन करा हे सांगतोय. पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या करणं हे चालू देणार नाही. भूलथापा बंद करा. तुम्ही वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय वाचा, असं संजय संजय राऊत म्हणाले.
तरीही निर्णय द्यावा लागेल
वेळकाढूपणाचं त्यांचं धोरण आहे. ते त्याप्रमाणे वागतील. पण ते होणार नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय द्यावे लागेल. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. तरीही त्यांना निर्णय द्यावा लागेल, असं ते म्हणाले.
पद आणि प्रतिष्ठा सांभाळा
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही. बदमाश राज्यपालाने जो लफंगा राज्यपाल बसवला होता त्यांनी निवडणूक होऊ दिली नाही. कारण त्यांना दिल्लीचे आदेश होते. कारण मोठं राजकारण करायचं होतं. आता अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाड नाही, पक्षांतराविषयी राग नाही, पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवलं आहे.
पण इतिहासात तुमची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल. तुम्हाला रस्त्यावर फिरणे मुश्किल राहील, असा इशारा देतानाच आज राय्पालांची काय अब्रु राहिली आहे? निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपले पद आणि प्रतिष्ठा सांभाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला.