Sanjay Raut: भाजपकडे मतं असती तर त्यांनी संभाजी छत्रपतींनाच उमेदवारी दिली असती; राऊतांचा पलटवार
Sanjay Raut: आता कोल्हापुरातून भाजपने एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली. पण हा त्यांचा प्रश्न आहे. मला आश्चर्य वाटतं दोन्ही उमेदवार राज्यसभेचे भाजपचे नाहीत. बाहेरचे आहेत. जे निष्ठावंत आहेत. जे संघपरिवाराशी संबंधित आहेत. त्यांना डावलल्याचं वाचलं.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (rajya sabha election) आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. आमच्याकडे पुरेशी मते आहेत, असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. तसेच शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावाही केला आहे. सातवी जागा ज्यांनी भरली आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजी छत्रपतींना (sambhaji chhatrapati) उमेदवार केलं असतं. आधी संभाजी छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा भाजपने प्रयत्न केला. आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते., यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील असा दावाही त्यांनी केला.
आता कोल्हापुरातून भाजपने एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली. पण हा त्यांचा प्रश्न आहे. मला आश्चर्य वाटतं दोन्ही उमेदवार राज्यसभेचे भाजपचे नाहीत. बाहेरचे आहेत. जे निष्ठावंत आहेत. जे संघपरिवाराशी संबंधित आहेत. त्यांना डावलल्याचं वाचलं. जे इतर पक्षातून आलेत ते फक्त शिवसेनेवर किंवा महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवारी दिलेली विदर्भातील एक व्यक्ती शिवसेनेत होती. शिवसेनेत काम केलं. दुसरा उमेदवार हा शिवसेना, कधी राष्ट्रवादी असा प्रवास करून आला आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे. हा जुना भाजप राहिला नाही. अशाच लोकांनी एकत्र येऊन हा पक्ष ताब्यात घेतला आहे. पण आम्ही निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे, असं राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील
सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. 25 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करतात. सोडून द्या. सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, सोनिया गांधी, अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्धवजींच्या नेतृत्वावर खुश आहेत. त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा, असं ते म्हणाले.
भाजपचं राजकारण एक जात, एका धर्माचं
भाजपने राज्यसभेवर एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप राष्ट्रावर बोलते. पण राष्ट्रीय एकतेवर कोणी बोलत असेल तर भाजपला कळत नाही. ते एक जात आणि एक धर्माचं राजकारण करतात. पण ठिक आहे. ती त्यांची विचारधारा आणि त्यांचं राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.
मराठवाड्यातील वातारवण ढवळून निघेल
शिवसेनेची औरंगाबादची सभा रेकॉर्डब्रेक असते. 8 जूनला उद्धव ठाकरे औरंगाबादला जातील. संध्याकाळी सभा आहे. त्यातून मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघेल, असंही ते म्हणाले.