Maharashtra Assembly Speaker Election: अभ्यास आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये, मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बनंतर संजय राऊतांचं राज्यपालांवर शरसंधान
विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्रं लिहून जोरदार हल्ला केला.
मुंबई: विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्रं लिहून जोरदार हल्ला केला. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर शरसंधान साधलं आहे. राज्यपाल हुशार आहेत. विद्धवान आहेत. अभ्यासू आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचं अजीर्ण होऊ नये. नाही तर पोटाचा त्रास होतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे उत्तर पाठवलं ते तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये. घटनेतील तरतूदीनुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती असते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारशी आणि लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत. विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचं आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचं अजीर्ण झालेलं आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचं आरोग्य खातं उपचार करायला सक्षम आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.
आघाडीत बिघाडी नाही
विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीवरून आघाडीत मतभेद आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, आघाडीत बिघाडीचा प्रश्नच येत नाही. राज्यपाल जर घटनेच्या विरुद्ध वागत असेल… राज्यपालांनी राजकीय वर्तन करावा असा त्यांच्यावर दबाव असेल तर सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
वेट अँड वॉच
अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झालं. आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे वेट अँड वॉच पाहा, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहण्याचे संकेत त्यांनी दिले.
त्या उद्योगात पडू नका
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्रं लिहून सुनावले होते. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये. आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणीदेखील या पत्रातून केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Live : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन संभ्रम, ठाकरे सरकार राज्यपाल संघर्षात काय घडणार?https://t.co/yYSbJpZd6T#ThackerayGovernment | #UddhavThackeray | #bhagatsinghkoshyari | #MaharashtraAssemblylive
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
संबंधित बातम्या: