Sanjay Raut: कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या; राऊतांचा राज ठाकरेंना टोला
Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून टोला लगावला आहे. मराठवाड्यातील जनता आमच्यापाठी आहे. पण लोकशाहीत कोणी कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. देशात लोकशाही आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना अयोध्या दौऱ्यावरून टोला लगावला आहे. मराठवाड्यातील जनता आमच्यापाठी आहे. पण लोकशाहीत कोणी कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. देशात लोकशाही आहे. कुणालाही सभा घेण्याची बंदी नाहीये. कुणाला कुठे सभा घ्यायची असेल तर घेऊ द्या. कोणी बाळासाहेबांची कॉपी करत असेल तर काय करणार? आम्हाला भपका करावा लागत नाही. कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या. शिवसेना (shivsena) आपल्या ताकदीवर राजकारण करत आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. यावेळी त्यांनी भोंग्यांचा विषय संपला आहे. त्याचं दळण दळत बसू नका. महाराष्ट्र शांत आहे. कोण काय करतंय आणि कुणाच्या सांगण्यावरून करतंय हे लोकांना कळतंय, असंही त्यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
अयोध्येत जाण्याचा निर्णय शिवसेनेने केला आहे, हा प्रश्न चुकीचं आहे. शिवसेनेना नेहमी अयोध्येत गेली आहे. आमचं अयोध्येशी नातं आहे. हा केवळ निवडणुकीचा भाग नाही. राजकीय षडयंत्र नाही. जेव्हापासून अयोध्येचं प्रकरण सुरू झालं तेव्हापासून शिवसेना आणि अयोध्येच भावनिक नातं आहे. श्रद्धेचं आहे. जेव्हा सरकार नव्हतं, तेव्हाही आम्ही जात होतो. महाराष्ट्रात सरकार झाल्यावर मुख्यमंत्री दोनदा अयोध्येला गेले आहेत. यात्री निवासचं काम आहे. त्याबाबतची आम्ही घोषणा केली होती. बरेच कामे आहेत तिथे. आमचं मन साफ आहे. आम्ही राजकीय फायद्यासाठी करत नाही. आम्ही श्रद्धेसाठी करतो. कुणाला जायाचं जाऊ द्या. स्वच्छ मनाने जावं. राजकीय भावनेने जाऊ नका. राजकीय भावनेने जाणाऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
राजभवनात जाणाऱ्या पैशाला कसे पाय फुटले?
भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. घोटाळ्यातील आरोपींनी ईओडब्ल्यू किंवा पोलिसांसमोर हजर राहावं. आता हा पोलीस तपासाचा भाग आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग सक्षम आहे. ईडी किंवा इन्कम टॅक्सपेक्षाही आमचे अधिकारी अशा प्रकारच्या तपासात सक्षम आहेत. पैसे कसे गोळा केले? त्याचं काय झाले? राजभवनात जाणाऱ्या पैशाला कसे पाय फुटले? ते कुठे गेले? याची माहिती समोर येईल, असं राऊत म्हणाले. भाजप काही म्हणेल. त्यांच्या म्हणण्यावर महाराष्ट्र चालला नाही. कायद्याचं राज्य आहे. कायद्याने चालणार आहे, असंही ते म्हणाले.
उघड्या नागड्यांकडून काय अपेक्षा करता?
भाजपने पोलखोल मोहीम हाती घेतली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे स्वत: उघडे नागडे झाले. त्यांच्याकडून पोलखोलची अपेक्षा काय करताय? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: