Sanjay Raut: अरे कसला अल्टिमेट?, काय होतं अल्टिमेटमने?, अल्टिमेटमने देश चालतो का?; राऊतांनी मनसेला सुनावले
Sanjay Raut: मी मुख्यमंत्र्यांना भेटलो चर्चा केली. सर्व रिलॅक्स आहेत.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंग्याबाबत दिलेला अल्टिमेटम दिला आहे. मात्र, शिवसेनेने (shivsena) राज ठाकरे यांच्या या अल्टिमेटमची खिल्ली उडवली आहे. अरे कसला अल्टिमेटम? काय होतं अल्टिमेटमने? अल्टिमेटवर देश चालतो का? अनेकांनी 100 दिवसात महागाई कमी होईल असं सांगितलं होतं. झाली का? त्यांनी स्वत:चं पाहावं स्वत:चा पक्ष सांभाळावा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जी देशात भूमिका घेतली जाईल तिच महाराष्ट्रात घेतली जाईल. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षम आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) सक्षम आहेत. शरद पवार सर्वात अनुभवी नेते आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल, त्यांना कुणी सुपारी दिली असेल तर सरकारने सर्वात आधी सुपारी देणाऱ्याांचा शोध घेतला पाहिजे. हे जे चाललंय ना हिंदू ओवैसींना सुपारी देऊन राज्याची शांतता बिघडवण्याचं काम, तर मला वाटतं सरकार सक्षम आहे त्यात. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो चर्चा केली. सर्व रिलॅक्स आहेत. कुणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतकं राज्य मजबूत पायांवर उभं आहे. या राज्याच्या प्रशासनाला फार मोठा अनुभव आहे, राज्यकर्त्यांना फार मोठा अनुभव आहे. कोणी उठतो हे करू, ते करू असं नाही होणार, असं संजय राऊत म्हणाले.
याला शौर्य म्हणत नाही
धमक्या देणाऱ्यांची ताकद नाही. त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत, जे अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांना सत्तेत येता आले नाही. त्यांना महाराष्ट्रातून लोकांनी दूर केलं आहे. त्यांचे जे वैफल्य आहे ते दुसऱ्यांच्या माध्यमातून बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाही. त्यांनी समोरून लढलं पाहिजे. ते अशापद्धतीने सुपाऱ्या देऊन लढत असतील तर लढावं म्हणा, असा टोलाही त्यांनी लगावला.
कुणी भ्रमात राहू नये
राज्यात एक प्रशासकीय व्यवस्था आहे. इथे कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर कुणाच्या अल्टिमेटमवर निर्णय घेतला जात नाही. राज्यात शांतता आहे. कुणी सभेतून इशारे दिले, धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होत नाही. तेव्हा कुणी भ्रमात राहू नये. आम्ही काही इशारे दिले म्हणजे अॅक्शन होत आहे असं काही नाही. आज चांगला दिवस आहे. लोकांना त्यांचा उत्सव साजरी करू द्या, असंही ते म्हणाले.