मुंबई: मनसेने पुकारलेलं भोंग्यांविरोधातील आंदोलन (LoudSpeaker Ban)अपयशी झाल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. कुठे आंदोलन आहे? कुठलं आंदोलन? मला कुठे आंदोलन दिसलं नाही. आंदोलनाचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरेंना (raj thackeray) डिवचले आहे. राज्यात भोंग्याच्या बाबतीत कायद्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सरकार सक्षम आहे. भोंग्यावर आंदोलन करावं अशी परिस्थिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे महासंचालक तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या प्रत्येकाचं नियोजन आणि भूमिका पाहिली असेल तर भोंग्याबाबत कायद्याचं उल्लंघन झालं नाही हे स्पष्ट होतं. त्यांनी कशासाठी हाक दिली माहीत नाही. सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिले आहे त्यानुसार काम केलं जात आहे. त्या पलिकडे कुणी जात असेल तर सरकार पाहून घेईल. मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यावर आंदोलन करावं अशी परिस्थिती बिघडली नाही, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
काल मी वर्षावर होतो. मुंबईत मशिदीवर भोंगे आहेत. त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. त्यांनी आवाजाचं पालन करण्याचं मान्य केलं. हाच नियम मंदिर आणि चर्चला आहे. इतर सार्वजिनक कार्यक्रमांना आहे. सर्वांनी पालन केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचं पालन करत नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा का करता? प्रत्येकाने धर्माच्या पलिकडे जाऊन कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं. धर्माच्यावर कायदा आहे. आम्ही कायद्याचे पालन करतो. इतरांनी पालन करावं, असं राऊत म्हणाले.
कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. महाराष्ट्रात कोणी चिथावणीची भाषा करत असेल, फक्त राजकीय स्वार्थासाठी केंद्रात बसलेला पक्ष अशा प्रकारे चिथावणीखोरांना बळ देत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्य नाही तर देश अशांत होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत महाराष्ट्रात भोंगेच नसतील आणि तुम्ही तुमचे भोंगे लावणार असाल तर तुम्ही आंदोलन करताय की बेकायदेशीर कृत्य करत आहात? आंदोलन काय असतं हे बघा. आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव शिवसेनेला आहे. माझ्या बाजूला शिशीर शिंदे आहेत. ते आंदोलनाचे जनक आहे. कशी आणि का करायची हे शिवसेनेकडून शिका. प्रसिद्धीसाठी आंदोलनं नसतात. आम्ही 50 वर्ष आंदोलन करत आहोत. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध आहे. काही लोकांचे छंद असतात. काही लोक राजाकारणात हौशे नौशे गवशे असतात. त्यांना राजकीय बळ प्रेरणा मिळत असते सर्व बाबतीत. त्यातून हे प्रकार घडत असतात. पण महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. बाळासाहेबांचे पूत्रं आहेत. त्यामुळे रस्त्यावरील नमाजबाबत काय करायचं आणि बेकायदेशीर भोंग्याबाबत काय करायचं याचे सल्ले कुणी देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.