Sanjay Raut | नितीन गडकरी यांना संपवण्याचं षडयंत्र! संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात
Sanjay Raut | भाजपने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही. त्यावरुन आता विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. भाजप महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मुद्दामहून खच्चीकरण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी खा. संजय राऊत यांनी पण तोफ डागली आहे.
मुंबई | 5 March 2024 : भाजपने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. 400 च्या पारचा नारा दिला आहे. लोकसभेसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजपला घेरले आहे. नितीन गडकरी दिल्लीत असूनही म्हणून त्यांचा पत्ता आतापासूनच कट करण्याचा हे षडयंत्र आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घातला. 4 दिवसांपूर्वी गडकरी शेतकऱ्यांबाबत स्पष्ट बोलले होते. मजूर आणि कष्टकरी हा दुःखी आहे. समाधानी नाही. कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का, असा सवाल त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना विचारला.
गडकरी यांना का डावलण्यात येत आहे?
- नितीन गडकरींना का डावले आहे हे आजच्या सामना संपादकीमध्ये स्पष्ट लिहिले आहे.नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहे. गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे ते दिल्ली ची गुलामी पत्करणार नाही असा त्यांचा स्वभाव आहे.आम्ही त्यांच्या सोबत जवळून काम केले आहे. नितीन गडकरी विकासाला महत्त्व देतात ते ढोंग बाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाही.आज जो विकास दिसत आहे ते म्हणजे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचे आहे, असे राऊत म्हणाले.
- गडकरी व्यासपीठावर पण स्वाभिमानाने आणि ताठ मानेने उभे असतात. राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा, अमित शहा यांनी डोळे वटारले की लांब व्हायचं, हे उद्योग गडकरी यांनी केल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. यामुळेच महाराष्ट्रात मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे, असा हल्लाबोल त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर केला.
भाजपला बहुमत नाही
2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष 220, 225 च्या पुढे जागा जिंकणार नाही. अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केलं. त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असूनही म्हणून गडकरींच्या पत्ता आतापासूनच कट करण्याचा हे षडयंत्र आहे. चार दिवसांपूर्वी गडकरी शेतकऱ्यां बाबत स्पष्ट बोलले होते मजूर आणि कष्टकरी हा दुःखी आहे समाधानी नाही कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का, असा सवाल त्यांनी केला.
नाना पटोले यांचा पण निशाणा
नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही, यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण चिंता व्यक्त केली.देशाचे मोठे नेते महाराष्ट्रात आहेत, भावी पंतप्रधान नितीन गडकरी असे असताना भाजपच्या यादीत त्यांच्या नाव नाही हे चिंतेचे वातावरण आहे. आता भाजपा पक्ष राहिला नाही तो मोदी परिवार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.