मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ सावा वर्धापन दिन आज दिल्लीत साजरा झाला. यावेळी शरद पवार यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष जाहीर केले. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा तो सोहळा आम्ही सगळे पाहत होतो. ती ऐतिहासिक घटना होती. शरद पवार, तारीक अन्वर आदी नेते उपस्थित होते. सोहळा मला आठवतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २५ वर्षे झाली आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात नवीन घडामोडी घडत असतील, तर त्यावर आम्ही का बोलावं. शरद पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नवीन जबाबदाऱ्या दिल्या असतील. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. ती कोण्या एका व्यक्तीची आघाडी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत निर्णयावर आम्ही बोलणार नाही,असं संजय राऊत स्पष्ट बोलले.
अजित पवार यांच्यावर अन्याय झाला का, असं विचारताच संजय राऊत म्हणाले, कुणावर आम्ही का बोलावं. अजित पवार हे बोलण्यास समर्थ आहेत. त्यांचे वकीलपत्र कुणाला दिलं का. भाजपला दिले का, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या. अजित पवार यांचे पंख काढले का, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. विरोधी पक्षनेते आहेत. दोन्ही पदे महत्त्वाची आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला २५ वर्षे झालीत. त्यांच्या पक्षप्रमुखांनी काही बदल आणले. काही जणांवर जबाबदारी दिली आहे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. बाहेरील लोकांनी त्यावर चर्चा करावी, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.