छगन भुजबळ हे न सुटणारं कोडं, संशोधनाचा विषय…; मित्र पक्षातील नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या
Sanjay Shirsat on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं नाव घेत महायुतीच्या नेत्याने विधान केलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत एक विधान केलंय. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबतही त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर...
मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे स्वपक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर संधी मिळावी, यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील होते. मात्र ती संधी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र माझ्या चेहऱ्यावर दिसतं का की मी नाराज आहे? अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी स्वत: दिली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे न सुटणारं कोडं आहे. त्यांची भूमिका हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं जिकरिचं ठरेल. भुजबळांना कोणती गोष्ट कुठे टाकायचा हे माहीत आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.
संजय राऊतांवर निशाणा
संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीका केली होती. त्याला आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांच्या टिकेला अर्थ नाही. मुर्खासारखं त्याचं स्टेटमेंट आहे. शिवसेना पक्षप्रमुखाचे विचार यांनी सोडले. जे आवडतं नव्हतं ते आचरणात आणलं. आता ज्ञान पाजळत आहेत. आम्ही गोधडीत होतो. पण मग तुम्ही त्या स्टेजवर होता का?, असा प्रतिप्रश्न संजय शिरसाट यांनी केला आहे.
डोममध्ये घेतलेला कार्यक्रम पाऊस पाणी पाहून घेतलाय. तुमची सर्व कामे आम्ही करत आहोत. याच डोममध्ये तुमच्या विरोधात राहुल नार्वेकर यांनी तुमच्या विरोधात निर्णय दिला. तेव्हा हे डोम कावळे काय करत होते? संजय राऊतानेच लांडग्याचे कातडं पांघरलंय. कातडं आमच्यावर नाही तुमच्यावर आहे. कातडं पांघरून तुम्ही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या पायाशी जाऊन बसले आहात, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय.
व्हायरल व्हीडिओवर प्रतिक्रिया
एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंना लोकसभेनंतर अहंकार आलाय. त्यांची बाजू संजय राऊत घेत आहेत. पाय धुतल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही. म्हणून पाय धुवत आहेत. महिला नानांना माफ करणार नाहीत. मग महात्मा गांधींच्या वारसा कसा जपत आहेत? महिला वर्गात नाना पटोलेंबाबत चीड आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची ही मस्ती उतरवली जाईल, असं शिरसाटांनी म्हटलं.