विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आलं आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असेल? याबाबतचा खल सुरु आहे. अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षात इतकं काम झाला नाही जे मागच्या अडीच वर्षात झालं आहे. कोणताही प्लॅन नाही प्लॅन ए नाही प्लॅन बी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. राज्यात एकनाथ शिंदे हेच चांगलं नेतृत्व करतील, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे, रामदास आठवलेंनी आम्हाला सांगू नये की आम्ही काय करायचं…
आठवले साहेब का म्हणाले ते माहीत नाही. यात त्यांचा काही रोल नाही तरी ते बोलतात, असं शिरसाट म्हणाले.
उदय सामंत यांनी शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, अशी भूमिका मांडली आहे. विरोधकांच्या दाव्यात दम नाही , मी चॅलेंज करतो की त्यांनी आपला विरोधी पक्ष नेता निवडून दाखवावा , आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाहीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सगळ्यांची इच्छा अद्याप मुख्यमंत्रिपदावर शिकाकमोर्तब झालं नाही. अडीच वर्ष राज्याच्या विकासाची आम्ही काम केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं आम्हाला वाटतं, असं सामंत म्हणालेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून लाडक्या बहिणीनी तुळजाभवानीला साकडं घातलं. भाजपच्या जागा जास्त असल्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं तुळजाभवानीला साकडं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी घातलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर महायुती निवडणूक लढली होती. राज्यात महायुतीच सरकार आलं. त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, अशी इच्छा महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा असल्या तरी बिहार पॅटर्न प्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं मत यावेळी महिला शिवसैनिकांनी व्यक्त केलं.