Lalit Patil : मी पळालो नाही, मला पळवलं गेलं – ललित पाटीलचा गौप्यस्फोट
ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर न्याायलयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी ललित पाटीलने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली. आज दुपारी त्याला अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. यावेळी न्यायालयात ललित पाटील याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मी ससूनमध्ये पळून गेलो नाही तर मला पळवलं गेलं, असा गंभीर, धक्कादायक आरोप पाटील याने केला.
ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ललित फरार होता. अखेर काल रात्री पोलिसांनी बंगळुरूमध्ये त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्स प्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
पाटीलने केले गंभीर आरोप
आज दुपारी पाटील याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर ललित पाटीलने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले अशी माहिती वकिलांनी दिली. तसेच पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याने केला. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं असा गंभीर आरोपही त्याने केल्याचे वकिलांनी सांगितलं. मला पळवण्यात कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगणार असंही तो म्हणाला, अशी माहिती समोर आली आहे.
ललित पाटील हा ससूनमधून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांपासून ललित फरार होता. अखेर तो बं गळुरूत असल्याची टिप मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू गाठून रात्रीच ललितच्या मुसक्या आवळल्या.
ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटीलच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावा ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.
ललित पाटीलची नार्को टेस्ट करा – एकनाथ खडसे यांची मागणी
दरम्यान ललित पाटील याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. धुळे आणि चाळीसगांवला ललित पाटील तीन दिवस थांबला होता अशी माहिती आहे. तो तेथे नेमका कशासाठी गेला होता, त्याचं कोणाशी कनेक्शन आहे, तेथे तो कोणत्या नेत्याला भेटला होता, असे प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.