मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चा दुसरा टप्पा लवकरच सुरू
मेट्रो 2 अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो 7 ( दहिसर – अंधेरी ) या मेट्रो मार्गिकेचा डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहीला टप्पा सुरू झालेला आहे. आता गोरेगाव ते गुंदवली हा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे.
मुंबई : मेट्रो 2 अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो 7 ( दहिसर – अंधेरी ) मार्गिकेचा दुसरा टप्पा ( Phase 2 ) लवकरच सुरू होत असल्याने शहरातील पहील्या घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मुंबई मेट्रो वनकडे चारच डब्यांच्या ट्रेन असून गाड्यांची संख्या किंवा डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
सध्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनवर दररोज 380 फेऱ्यांद्वारे आठवड्याचे कामकाजाच्या दिवसात सरासरी 3.80 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. कोरोनाकाळापूर्वी हीच संख्या 4.5 लाख प्रवासी इतकी होती. ती आता घटली आहे. पिकअवरला दर चार मिनिटांना तर नॉक पिकअवरला दर सहा ते आठ मिनिटाला एक फेरी चालविण्यात येत असते.
दोन नव्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 कार्यरत झाल्यानंतर तीन लाख या मार्गावर दररोज प्रवास करण्याची शक्यता आहे. सध्या वीस कि.मी.चा आरे ते डहाणूकरवाडी हा पहीला टप्पा सुरू आहे. त्यातून दररोज पंचवीस हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. मुंबई मेट्रो वनच्या वेस्टर्न एक्सप्रेस या स्थानकापासून मेट्रो लाईन – 7 च्या गुंदवली स्थानकापर्यंत प्रवाशांना इंटरचेंजिंगसाठी एमएमआरडीएने 58 मीटर लांबीचा पादचारी पुल बांधला आहे. त्यामुळे या दोन मेट्रोच्या प्रवाशांना रस्त्यावर न उतरता या दोन्ही मेट्रोच्या प्रवाशांना एका मेट्रोतून दुसरीत सहज जाता येणार आहे.
मुंबई मेट्रो वनकडे एकूण 16 ट्रेन असून 13 प्रत्यक्षात मेन लाईनवर धावत असतात. एक वर्सोवा येथे स्टँडबाय ठेवलेली असते तर उर्वरीत दोन ट्रेन मेन्टनन्ससाठी वर्कशॉपला जात असतात. आता नव्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे दोन्ही टप्पे कार्यरत झाल्यानंतर मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने मुंबई मेट्रो वनने चार डब्यांच्या ऐवजी सहा डब्यांच्या गा़ड्या चालवाव्यात अशी मागणी केली जात आहे.
2014 साली सुरू झालेली घाटकोपर ते वर्साेवा धावणारी मुंबई मेट्रो वन मध्य रेल्वेवर घाटकाेपर स्थानकात तर पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात एकमेंकांना जोडली गेली असून त्यामुळे या दोन स्थानकातील प्रवाशांची संख्या गेली काही वर्षे प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.
‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’चा डहाणुकरवाडी–दहीसर–आरे कॉलनी असा एकूण 20 किमीचा पहिला टप्पा गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. मेट्रो 2 अ मधील डहाणूकरवाडी ते डी. एन. नगर आणि मेट्रो 7 मधील डहाणूकरवाडी ते अंधेरी असा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.